
- Prep Time: १५ minutes
- Cook Time: २० minutes
- Serving: १५-२० रोल्स
काजू पिस्ता रोल रेसिपी
काजू पिस्ता रोल ही एक अतिशय आकर्षक व चवदार मिठाई आहे. काजूचे बाहेरील पांढरे कवच व आतमध्ये पिस्त्याचे पिवळट-हिरवे सारण असलेली ही मिठाई जरी दिसायला अवघड दिसत असली तरी घरी बनवायला फारशी अवघड नाही. इथे दिलेल्या सूचनांच्या मदतीने तुम्ही ही अवघड दिसणारी मिठाई सुद्धा आरामात आणि अगदी थोड्या वेळांत घरी बनवू शकाल. ह्या रेसिपी मध्ये मी मिल्क पावडर वापरली आहे पण ती घातल्यास किंचित खव्याचा स्वाद येतो. पण तसे नको असल्यास मिल्क पावडर पूर्ण वगळली तरीही चालेल.
Ingredients
- सारणासाठी
- हिरवे पिस्ते - १/४ कप
- पिठीसाखर - २ टेबलस्पून
- वेलदोड्याची पूड - एक चिमूट
- दूध - १/२-१ टीस्पून
- खायचा हिरवा रंग (ऐच्छिक)
- बाहेरच्या कवचासाठी
- काजू - १ कप
- साखर - २/३ कप
- मिल्क पावडर (ऐच्छिक) - ३ टेबलस्पून
- तूप - किंचित हाताला लावण्यासाठी
Instructions
सारणासाठी:
- पिस्ते मिक्सर मध्ये किंचित भरड वाटून पावडर करून घ्या.
- त्यात पिठीसाखर, वेलदोड्याची पूड, व हवा असल्यास थोडा खायचा रंग घाला.
- सगळे मिसळत चमच्याने थोडे थोडे दूध घालत त्याचा मऊसर कणकेप्रमाणे गोळा तयार करून घ्या.
- ह्या सारणाचे ४ एकसारखे भाग करून झाकून ठेवा.
कवचासाठी:
- मिक्सर मध्ये काजूची अगदी बारीक पावडर करून घ्या.
- मिल्क पावडर (ऐच्छिक) वापरात असल्यास ती कढईमध्ये एखादा मिनिट भाजून बाजूला काढून घ्या. (मिल्क पावडर वापरत नसल्यास ही स्टेप वगळावी.)
- त्याच कढईत १/२ कप पाणी आणि साखर मिसळून त्याला उकळी येऊ द्या.
- सतत हालवत तसेच उकळत ठेवा.
- थोड्या थोड्या वेळाने (१-२ मिनिटाने) पाकाचा थेंब दोन बोटांमध्ये घेऊन पहा. त्याची एक तार यायला हवी.
- एक तार दिसू लागताच लगेच गॅस बारीक करा.
- त्यात वर बनविलेली काजूची पावडर घाला व सतत हालवत रहा. जेंव्हा हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल व हालवायला जड वाटेल किंवा त्याचा गोळा बनायला सुरवात होईल तेंव्हा गॅस बंद करून टाका.
- आता कढई खाली उतरवून त्यात मिल्क पावडर घाला. (मिल्क पावडर वापरात नसल्यास ही स्टेप वगळावी.)
- सगळे मिसळून, हाताने उचलता येईपर्यंत, चमच्याने वर खाली करीत रहा. आणि हात लावण्यासारखे गार झाल्यावर हाताला थोडे तूप लावून हलक्या हाताने मळून मऊ करून घ्या.
कृति:
- कवाचासाठी मळून घेतलेल्या मिश्रणाचा अर्धा भाग घ्या व त्याचा गोळा बनवून घ्या. उरलेला अर्धा भाग झाकून ठेवा.
- तो गोळा पार्चमेन्ट पेपर लावलेल्या एका पोळपाटावर पातळ (१-२ मिलिमीटर जाड) व गोल लाटून घ्या.
- लाटलेली पोळी मधून कापून तिचे २ अर्धगोल बनवून घ्या.
- सारणाचा एक भाग घेऊन त्याची सुरळी बनवून घ्या.
- ती सुरळी एका अर्धगोलाच्या कापलेल्या बाजूवर ठेवून घ्या.
- आता त्याच बाजूने गुंडाळी करत रोल बनवून घ्या.
- तसेच सारणाच्या दुसऱ्या भागाने व दुसऱ्या अर्धगोलाने ही आणखीन एक सुरळी बनवून घ्या.
- दोन्ही सुरळ्यांचे साधारण २" मोठे रोल्स कापून घ्या.
- उरलेल्ल्या कवचाचे व सारणाच्या २ भागांचे ही असेच (कृतिक्रमांक १ पासून) गुंडाळी करून रोल्स कापून घ्या.