
- Prep Time: १५ minutes
- Cook Time: ३० minutes
- Serving: ५ जणांसाठी
कोथिंबीर वडी रेसिपी
कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी हे एक चहाबरोबर खायचे किंवा जेवणाबरोबर खायचे उत्कृष्ट स्नॅक आहे. तसेच ही वडी डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करता येते. डीप फ्राय केलीली कोथिंबीर वडी आतून तसेच बाहेरूनही कुरकुरीत असते व शॅलो फ्राय केलीली कोथिंबीर वडी आतून मऊ पण बाहेरून कुरकुरीत असते. दोन्ही प्रकारच्या वड्या छान लागतात. वाफवलेली कोथिंबीर वडी फ्रीज मधे ३-४ दिवस टिकू शकेल व ती तुम्ही ऐन वेळेला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून गरम गरम वाढू शकता.
Ingredients
- हरभऱ्याची डाळ - १ कप
- कोथिंबीर - ४ कप
- हिरव्या मिरच्या - ३-४ किंवा चवीप्रमाणे
- मीठ - चवीनुसार
- सोडियम बायकार्बनेट (खायचा सोडा) - १/४ टीस्पून
- डाळीचे पीठ / बेसन - २ टेबलस्पून
- तेल - २ टीस्पून पिठात घालायला व डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय साठी आणखीन
Instructions
- हरभऱ्याची डाळ २ कप पाण्यात २-३ तासांसाठी भिजत ठेवा. २-३ तासांनंतर त्यातील पाणी काढून टाका.
- वाटायला आवश्यक तेवढेच पाणी वापरून डाळ किंचित भरड वाटून घ्या. वाटतानाच त्यात मीठ व हिरव्या मिरच्या ही घाला.
- वाटलेल्या डाळीत बेसन, खायचा सोडा, व २ टीस्पून तेल घालून चांगले फेटून घ्या.
- कोथिंबिरीची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या व ती वरील (कृतिक्रमांक ३) पिठात मिसळा.
- सर्व पीठ एका थोडे तेल लावलेल्या कुकरच्या भांड्यात किंवा सपाट तळ असल्या कुकर मधे ठेवता येण्यासारख्या एका तेल लावलेल्या भांड्यात घाला.
- हाताने केकप्रमाणे सपाट करून घ्या.
- आता १५-२० मिनिटे प्रेशर कुकर मधे वाफवून घ्या. (प्रेशर ठेऊ नका)
- वाफवल्यावर पूर्ण गार होऊ द्या व मग त्याचे १ & १/२ ते २ इंच मोठे चौकोनी काप करून घ्या व भांडे उलटे करून सर्व काप एका ताठलीत काढून घ्या. (तुम्हाला हवे असतील तर भांड्यातून बाहेर काढल्यानंतर आणखीन छोटे छोटे कापही करू शकता.)
- डीप फ्राय करण्यासाठी सर्व काप तेलात किंचित गुलाबी दिसायला लागेपर्यंत तळून घ्या.
- शॅलो फ्राय करण्यासाठी एका तव्यावर थोडे तेल घालून त्यात एकावेळेला थोडे थोडे काप ठेऊन ते सगळीकडून किंचित गुलाबी दिसेपर्यंत शॅलो फ्राय करून घ्या.
- गरम गरम कोथिंबीर वडी कुरकुरीत असतानाच वाढा.