
- Yield: ४ जणांसाठी
- Prep Time: ३० minutes
- Cook Time: ३० minutes
- Serving: ४ जणांसाठी
मिक्स व्हेज परोठा रेसिपी
अनेक भाज्यांनी बनलेला हा मिक्स व्हेज परोठा अतिशय पौष्टिक व चविष्ट रेसिपी आहे. मुलांनाही हा परोठा आवडेल व त्यांच्या पोटात ह्यातील भाज्याही जातील अशी ही रेसिपी आहे. इथे मी ज्या भाज्यांचे सारण बनविले आहे त्यात हवा तसा फेरबदल करून तुम्ही अनेक वेगवेगळ्या भाज्या जसे पालक, मेथी, किसलेला फ्लॉवर वगैरे ही घालू शकता.
Ingredients
- फिलिंग साठी:
- गाजर - १/२ कप सोलून किसलेली
- कोबी - १/२ कप बारीक चिरलेली
- हिरवे मटार - १/२ कप किंचित भरड वाटलेले
- श्रावण घेवडा (फ्रेंच बीन्स) - १/२ कप अगदी बारीक चिरलेला
- तेल - आवश्यकतेनुसार
- कांदा - १ बारीक चिरलेला
- आलं - १/२ टीस्पून किसलेले
- लसूण - २ टीस्पून किसलेला
- गरम मसाला - १ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- ठेचलेल्या हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट - चवीप्रमाणे
- आमचूर - १/२ टीस्पून
- कव्हर साठी :
- गव्हाचं पीठ (कणीक) - १ & १/२ कप
- मीठ - १/२ टीस्पून
- तेल - २ टीस्पून
Instructions
फिलिंग साठी :
- सर्व भाज्या साहित्यात सांगितल्याप्रमाणे किसून किंवा बारीक चिरून तयार ठेवा.
- १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, चिरलेला कांदा, किसलेले आलं व किसलेला लसूण घाला.
- कांदा व लसूण किंचित गुलाबी दिसायला लागल्यावर त्यात गरम मसाला घाला व अजून एखादा मिनिट परता.
- आता त्यातच सर्व भाज्या (कृतिक्रमांक १ मधील) घालून मिसळा.
- त्यात मीठ, हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट व आमचूर घालून परत सर्व मिसळा.
- पाच मिनिटे मध्यम आचेवर सारणातील ओलसरपणा कमी होईपर्यंत परतून घ्या.
- तयार फिलिंग गार होण्यासाठी ठेऊन द्या.
कव्हर साठी :
कणकेमध्ये १/२ टीस्पून मीठ व २ टीस्पून तेल घालून मिसळा व लागेल तसे पाणी घालून मऊसर कणीक मळून घ्या. मळलेली कणीक १०-१५ मिनिटे झाकून बाजूला ठेऊन द्या.
पुढील कृति :
- कणकेचा २ इंच मोठा गोळा घेऊन त्याची अंदाजे ५ इंच मोठी पुरी लाटून घ्या.
- त्यातमधे ३ टेबलस्पून सारण ठेऊन सगळीकडून वर आणा व वरून तोंड बंद करून टाका.
- दोन्ही कडून पीठ लाऊन ३-४ मिलीमीटर जाड राहील असा पराठा लाटून घ्या.
- आता गरम तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी पराठा भाजून घ्या व भाजताना परोठ्याच्या दोन्ही बाजूंने १/२ टीस्पून तेल सोडा. दोन्ही कडून छोटे छोटे ब्राउन डाग दिसेपर्यंत पराठा खमंग भाजून घ्या.
- त्याचप्रमाणे सर्व कणकेचे व फिलिंगचे परोठे बनवा.
- गरम गरम परोठे लोणी, दही व लोणच्याबरोबर वाढा.