
- Yield: Serves 4
- Prep Time: २० minutes
- Cook Time: ३० minutes
- Serving: ४ जणांसाठी
सांबार रेसिपी
सांबार हे साउथ इंडियन पदार्थांबरोबर नेहमीच वाढले जाते. मग ते जेवण असू देत किंवा डोसा, उत्तपम, किंवा वडा. सांभारासाठी लागणारा सांबार मसाला ही घरी बनवायला सोपा आहे. घरचा ताजा सांबार मसाला वापरून बनविलेले सांभार अतिशय चविष्ट लागते.
Ingredients
- तुरीची डाळ - १ कप
- कोरडी चिंच किंवा चिंचेचा कोळ - १ * १ इंच चा छोटा चौकोनी तुकडा किंवा १/२ टीस्पून चिंचेचा कोळ
- आपल्या आवडीच्या भाज्या - गाजर, दूधभोपळा, शेवग्याच्या शेंगा वगैरे, आपल्या आवडीप्रमाणे कमी/जास्त
- तेल - ४ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- कढिलिंब - ५-६
- कांदा - १ छोटा उभा उभा किंवा बारीक चिरलेला
- मीठ - चवीनुसार
- सांबार मसाला - २ टीस्पून
- लाल तिखट - आवडीप्रमाणे (ऐच्छिक)
Instructions
- वाळलेल्या चिंचेचा तुकडा १/४ कप गरम पाण्यात १/२ तास भिजवून ठेवा व मग हाताने कुस्करून त्याचा कोळ काढून घ्या. (जर चिंचेचा तयार कोळ वापरात असाल तर ही स्टेप वगळा.)
- तुरीची डाळ स्वच्छ धुऊन त्यात २ कप पाणी घाला.
- प्रेशर कुकर मध्ये तीन शिट्या होईपर्यंत शिजवा व मग गॅस बारीक करून पाच मिनिटे आणखीन शिजू द्या. पाच मिनिटांनंतर गॅस बंद करा व कुकर गार झाल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढून घ्या.
- रवीने किंवा एका चमच्याच्या मागील बाजूने डाळ चांगली घोटून घ्या.
- आपल्या आवडीच्या चिरून ठेवलेल्या भाज्या (साधारण १/२ कप) मायक्रोवेव्ह मध्ये थोडे पाणी घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. (मायक्रोवेव्ह ऐवजी कृतिक्रमांक ८ मध्ये पाण्यात टाकून उकळल्यावर ही शिजविता येतील.)
- पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, कढिलिंब, व चिरलेला कांदा घाला.
- कांदा किंचित गुलाबी होईपर्यंत परता व दीड कप पाणी घाला.
- त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट (ऐच्छिक), चिंचेचा कोळ व सांबार मसाला घालून उकळी येऊ द्या.
- आता त्यात चिरून ठेवलेल्या भाज्या घाला व ५ मिनिटे उकळू द्या म्हणजे भाज्या शिजतील व मसाल्याचा अर्क पाण्यात उतरेल. (जर तुम्ही आधीच मायक्रोवेव्ह मध्ये भाज्या शिजवून घेतल्या असतील तर पाच मिनिटे उकळल्यानंतर मग भाज्या घाला.)
- पाच मिनिटे उकळल्यानंतर घोटून ठेवलेली डाळ ही घाला.
- आता हवे असल्यास आणखीन पाणी घालून सांभार हवे तसे पातळ करून घ्या.
- ३-४ मिनिटे तसेच उकळल्यावर गॅस बंद करा.
- गरम गरम सांबार, इडली, वडा, डोसा किंवा उत्तपम बरोबर वाढा.