
- Prep Time: १० minutes
- Cook Time: १५ minutes
कटाची आमटी रेसिपी
कटाची आमटी आणि पुरण पोळी ह्या दोन्ही रेसिपी जोडलेल्याच आहेत कारण पुरण पोळी केली म्हणजे कटाची आमटी असलीच पाहिजे. पुरणाची डाळ शिजविल्यावर डाळीवर राहिलेले पाणी म्हणजे 'कट'. आणि ह्या कटाची आमटी म्हणजे कटाची आमटी. ही आंबट-गोड आमटी अगदी पातळ असते व पुरण पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर नुसती प्यायला खूपच चविष्ट लागते.
Ingredients
- कट - २-२ & १/२ कप
- वाळलेली चिंच किंवा चिंचेचा तयार पल्प - १/२ इंच मोठा तुकडा किंवा १/२ टीस्पून रेडीमेड पल्प
- जिरे - १ टीस्पून
- सुकं खोबरं - १ टेबलस्पून किसलेले
- तेल - ३/४ टेबलस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - 1/४ tsp
- हळद - १/२ टीस्पून
- तमालपत्र - २ पानं
- दालचीनी - १ -१&१/२ इंच मोठा तुकडा
- कढीलिंब - ४-५
- मीठ - स्वादानुसार
- लाल तिखट - स्वादानुसार
- काळा / गोडा मसाला - २ टीस्पून
- गूळ - २ टेबलस्पून
Instructions
- पुरण पोळी साठी हरभऱ्याची डाळ शिजवल्यावर डाळीवर जे पाणी राहते ते म्हणजे 'कट'. जर डाळ शिजल्यावर जास्त पाणी उरले नसेल तर शिजलेली डाळ एका पातेल्यात काढून आमटीसाठी लागेल तेवढे आणखीन पाणी डाळीवर घाला (२ & १/२ कप कटासाठी ३ कप पाणी घाला.) व डाळीसकट गॅसवर उकळायला ठेवा. उकळल्यावर दहा मिनिटे मध्यम आचेवर तसेच उकळत ठेवा व मग गॅस बंद करा. आता डाळीवरचे पाणी म्हणजे 'कट' ओतून बाजूला काढून घ्या. (बाकीच्या पदार्थांचे दिलेले प्रमाण साधारण २ & १/२ कप कटासाठी आहे.)
- वाळलेली चिंच वापरत असाल तर ती अर्धा तास गरम पाण्यात भिजत घाला. (रेडीमेड चिंचेचा कोळ वापरत असाल तर ही स्टेप वगळा.)
- जिरे व खोबरे वेगवेगळे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या व एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
- एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला. ती तडतडल्यावर हिंग, हळद, तमालपत्र, दालचिनी व कढीलिंब घाला.
- आता कृतिक्रमांक १ मध्ये काढून घेतलेला कट घाला.
- त्यात मीठ, लाल तिखट, वाटलेले जिरे-खोबरे (कृतिक्रमाक ३ मधील) आणि काळा / गोडा मसाला घाला.
- रेडीमेड चिंचेचा पल्प किंवा भिजवून ठेवलेल्या चिंचेचा कोळ काढून तोही आमटीत मिसळा.
- गूळ घालून आमटीला उकळी येऊ द्या.
- २-३ मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करा व गरम गरम कटाची आमटी पुरण पोळीबरोबर किंवा वरण-भाताबरोबर वाढा.