
- Prep Time: ३० minutes
- Cook Time: ३० minutes
- Serving: ३०-३५ चकल्या
चकली रेसिपी
चकली हा एक दिवाळीच्या फराळातील तसाच चहाबरोबर खायचा एक खमंग स्नॅक् आहे. चकलीसाठी लागणारे पीठ म्हणजेच चकळीची 'भाजणी' बाजारात विकत तर मिळतेच पण घरी बनवायला अवघड नाही. मात्र ही भाजणी अगदी बारीक दळलेली असायला हवी. त्यासाठी घरी प्रोफेशनल क्वालिटीचा मिक्सर नसेल तर सगळी धान्यं घरी भाजून मग एखाद्या गिरणीतून दळून घ्यावीत. (मी ही भाजणी घरीच मिक्सरवर दळून बनविली आहे.)
चकली कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स मी रेसिपीच्या शेवटी दिल्या आहेत. त्या सुरवात करायच्या आधी नक्की पाहून घ्या.
Ingredients
- चकलीच्या भाजणी साठी:
- तांदूळ - १ कप
- हरभऱ्याची डाळ - १/२ कप
- उडदाची डाळ - १/४ कप
- धने - २ टेबलस्पून
- जिरे - १ टेबलस्पून
- चकली बनविण्यासाठी :
- तेल - २ & १/२ टीस्पून पिठासाठी व तळण्यासाठी आणखीन
- तीळ - १ टीस्पून
- लाल तिखट - स्वादानुसार (अंदाजे १ & १/२ टीस्पून)
- हळद - १/२ टीस्पून
- मीठ - स्वादानुसार ( अंदाजे १ & १/२ टीस्पून)
- चकलीची भाजणी - २ कप
Instructions
भाजणी साठी (साधारण ३ कप भाजणी साठी) :
- एका कढईत तांदूळ २-३ मिनिटे मध्यम आचेवर अगदी किंचित गुलाबी दिसेपर्यंत भाजून घ्या.
- तसेच भाजणीला लागणारे बाकीचे पदार्थही (उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, धने, व जिरे) २-३ मिनिटे किंचित गुलाबी दिसेपर्यंत भाजून घ्या.
- सगळे भाजलेले पदार्थ गार झाल्यावर मिक्सर मध्ये किंवा गिरणीतून अगदी बारीक दळून घ्या.
- तयार भाजणी चकली बनविण्यासाठी लगेच वापरा किंवा डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेऊन द्या व हवी तेंव्हा वापरा. (ही भाजणी फ्रीज मध्ये वर्षभर सुद्धा टिकते.)
चकली बनवायची कृति :
- एका कढईत २ कप पाणी गरम करायला ठेवा.
- त्यात २ & १/२ टीस्पून तेल, तीळ, लाल तिखट, मीठ, व हळद घाला.
- पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करा व भाजणी घालून मिसळून घ्या.
- १५-२० मिनिटे झाकून ठेवा व नंतर भाजणी चांगली मळून घ्या.
- चकलीचा सोऱ्या वापरून पोळपाटावर किंवा पारचमेन्ट पेपर वर चकल्या पाडून घ्या. (खालील चित्रांत मी नवीन पद्धतीचा व जुन्या पद्धतीचा असे दोन्ही सोऱ्ये दाखविले आहेत. ह्यातील कोणताही वापरला तरी चालेल.)
नवीन पद्धतीचा सोऱ्या नवीन पद्धतीचा सोऱ्या -
जुन्या पद्धतीचा सोऱ्या (वरचे चित्र) - तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करून घ्या व तेलाचे तापमान तपासायला थोडीशी भाजणी तेलात टाकून पहा. ती तरंगून वर आली म्हणजे तेल तापले आहे.
- आता बारीक ते मध्यम आचेवर सगळ्या चकल्या छोट्या छोट्या बॅचेस मध्ये सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्या.
- जास्तीचे तेल निथळून, तळून झालेल्या चकल्या एका पेपर टॉवेलवर काढा.
- पूर्ण गार झाल्यावर चकल्या एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.
काही टिप्स:
- भाजणी साठी धान्यं भाजताना सगळी धान्यं (डाळी व तांदूळ) भाजून जास्त ब्राऊन करू नका. किंचित गुलाबी दिसू लागताच गॅस बंद करा.
- भाजणी अगदी बारीक (पावडर सारखी) दळून घ्या.
- भाजणीची सगळी धान्यं वेगवेगळी दळून बारीक केली तरी चालेल पण शेवटी मात्र सगळे दळलेले पदार्थ एकत्र करून परत एकदा नक्की दळून घ्या.)
- चकलीची भाजणी आधीपासून तयार करून ठेवलीत तरी चालेल. ही भाजणी फ्रीजमध्ये एक वर्षापर्यंत सुद्धा छान टिकेल.)
- १५-२० मिनिटे भाजणी झाकून ठेवल्यानंतर चकल्या पाडायच्या आधी भाजणी चांगली मळून घेणे खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला भाजणी थोडी कोरडी वाटत असेल तर किंचित पाण्याचा ओलसर हात घेऊन ही मळायला हरकत नाही.)
- तळताना प्रत्येक बॅच निदान ४-५ मिनिटे तरी तळली गेली पाहिजे म्हणजे चकली आतपर्यंत कुरकुरीत होईल. त्याप्रमाणे गॅस बारीक किंव्हा मोठा करा.
- जर तेलात टाकल्यावर चकली फिसकटत असेल, तर २-३ टेबलस्पून भाजणी आणखीन घालून परत एकदा चांगले मळून घ्या. तसेच चकली खूपच नाजूक पडत असतील व उचलतानाच मोडत असतील तरी सुद्धा आणखीन २-३ टेबलस्पून भाजणी घालून चांगली मळून घ्या व मग चकल्या पाडा.)
- चकलीचा पहिला घाणा तळून काढल्यावर चकली थोडी गार होऊ द्या व आतपर्यंत कुरकुरीत आहे की नाही ते तपासून पहा. जर आत थोडी मऊ राहत असेल तर भाजणीत कढईतलेच १-२ टीस्पून गरम तेल घालून मळून घ्या व मग बाकीच्या चकल्या पाडा.
- चकल्या पूर्ण गार झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा म्हणजे कुरकुरीत राहतील.