
- Prep Time: १५ minutes
- Cook Time: ३० minutes
- Serving: २५-३० वड्या
सुरळी वडी रेसिपी
सुरळी वडी हे एक खूपच सुरेख आणि चविष्ट असे महाराष्ट्रीयन स्नॅक आहे. सुरळी वडी आणि गुजराथी खांडवी ह्या दोन्ही मध्ये पुष्कळ साम्य असते. फरक एवढाच की खांडवीच्या आत कुठलेच सारण नसते, पण सुरळी वडीत ताजे खोबरे व कोथिंबिरीचे सारण असते.
सुरळी वडीसाठी लागणारे ताक घरी तयार नसेल तर तुम्ही दह्यात पाणी घालून आधी ताक तयार करून घ्या आणि मग ते वापरा. त्यासाठी मी नुसत्या ताकाचे व तसेच दही-पाणी मिश्रणाचे प्रमाण ही खाली दिले आहे.
खरं तर सुरळी वडीचे बाहेरचे कवच डाळीच्या पिठामुळे आपोआपच हलक्या पिवळ्या रंगाचे बनते व छान दिसते पण तुम्हाला जर आणखीन गडद पिवळा रंग हवा असेल तर पिठात थोडी हळद घातली तरी चालेल.
योग्य प्रमाणात घट्ट असे पीठ शिजवून घेणे ही सुरळी वडीच्या रेसिपीतली एक अत्यंत म्हणवपूर्ण स्टेप आहे. ती एकदा व्यवस्थित जमली की बाकीची कृति अगदी सोपी आहे. मला खात्री आहे की खाली दिलेल्या व्हिडिओ च्या मदतीने तुम्ही हा विशेष प्रकारचा महाराष्ट्रियन खाद्यपदार्थ आरामात बनवू शकाल.
Ingredients
- ताक किंवा दही - ३/४ कप ताक किंवा १/२ कप दही आणि १/४ कप पाण्याचे मिश्रण
- डाळीचे पीठ (बेसन) - १ कप
- हळद (ऐच्छिक) - १/४ टीस्पून
- तेल - २ टेबलस्पून
- मोहरी - ३ टीस्पून
- हिंग - १/२ टीस्पून
- ताजं खवलेलं खोबरं - १ कप
- कोथिंबीर - १/२ कप बारीक चिरलेली
- मीठ - स्वादानुसार
- हिरव्या मिरच्या - स्वादानुसार, बारीक ठेचलेल्या
Instructions
बाहेरच्या कवचासाठी :
- एका भांड्यात २ कप पाणी, ३/४ कप ताक (किंवा १/२ कप दही व १/४ कप पाण्याचे मिश्रण) व चवीप्रमाणे मीठ घालून मिसळून घ्या.
- त्यात डाळीचे पीठ घाला व हाताने सगळ्या गुठळ्या मोडेपर्यंत मिसळून घ्या. किंवा हे मिश्रण चांगले मिसळून घ्यायला मिक्सर/ब्लेंडर मधून एकदा फिरवून घेतले तरी चालेल.
- काही रिकाम्या ताठल्या पीठ पसरण्यासाठी तयार ठेवा. (ताठळ्यांच्या ऐवजी अल्युमिनियम फॉइल वापरली तरी चालेल.)
- आता हे मिश्रण बारीक ते मध्यम आचेवर, सतत हालवत शिजायला ठेवा. सुरवातीला गॅस मोठा ठेवला तरी चालेल पण घट्ट व्हायला सुरवात झाली की मग थोडा बारीक करा. मात्र सतत हालवत रहा म्हणजे पातेल्याला खाली चिकटून करपणार नाही.
- १०-१२ मिनिटात हे मिश्रण छान घट्ट होईल व आटून जवळ जवळ अर्धे होईल असे झाल्यावर गॅस अगदी बारीक करा.
- आता तयार पिठाचे साधारण दोन मोठे चमचे पीठ, पसरून तयार ठेवलेल्या एका ताठलीच्या मधोमध घाला व चमच्याच्या मागील बाजूने डोसा पसरल्या प्रमाणे गोल व पातळ पसरून घ्या.
- असेच थोडे थोडे पीठ गार व्हायच्या आत प्रत्येक ताठळीत घालून पसरून घ्या व गार व्हायला ठेऊन द्या. (साधारण ५-६ ताठल्या लागतील.) (सगळे पीठ पसरून झाल्यावर पातेल्याखालाचा गॅस बंद करायला विसरू नका :))
सारणासाठी :
- एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून घ्या व त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग घाला व गॅस बंद करून टाका व ही फोडणी गार होण्यास ठेवा.
- आता खवलेले खोबरे, चिरलेली कोथिंबीर व ठेचलेल्या मिरच्या एकत्र करून घ्या व त्यात चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मिसळून घ्या.
पुढील कृति :
- गार झालेली फोडणी प्रत्येक ताठलीत पसरून ठेवलेल्या पिठावर थोडी थोडी पसरून घाला.
- त्याचप्रमाणे खोबरे-कोथिंबीर मिश्रण ही प्रत्येक ताठळीतल्या पिठावर पसरून घ्या.
- आता हळूच पिठाला कडेने एका बोटाने उचलून त्याची सावकाशपणे गुंडाळी करून घ्या.
- ह्या गुंडाळीच्या म्हणजेच सुरळीच्या दीड ते दोन इंच मोठ्या वड्या कापून घ्या. सुरळीच्या वड्या आता वाढायला तयार आहेत. फ्रीज मध्ये ठेवल्यास ह्या वड्या १-२ दिवस टिकतील.