- Prep Time: 15 minutes
- Cook Time: 15 minutes
- Serving: ७-८ जणांसाठी
मसाला डोसा
मसाला डोसा हा साउथ इंडिया मधील प्रसिद्ध व नेहमी बनविला जाणारा पदार्थ. डोसा जरी साऊथ इंडियातील पदार्थ असला तरी संपूर्ण भारतातच हा अतिशय आवडीचा आहे. डोस्याचे प्रकार अनेक आहेत परंतु मसाला डोसा हा एक बनवायला अगदी सोपा डोसा आहे. डोस्याच्या पिठाचे चांगले फरमेंटशन होण्यासाठी गरम हवामान असल्यास उत्तम पण थंडीतही घरातील उबदार जागेत जसे ओव्हन मध्ये, गॅस जवळ, वगैरे ठेवल्यास हे पीठ चांगले फरमेंट होते.
Ingredients
- डोस्याच्या पिठासाठी :
- तांदूळ - ३ कप
- पोहे (मध्यम जाड) - १/२ कप
- उडदाची डाळ - १ कप
- मेथी दाणे - १ टीस्पून
- मीठ - स्वादानुसार
- मसाल्यासाठी :
- बटाटे - ४ मध्यम आकाराचे
- तेल - ४ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - एक चिमूट
- हळद - १/२ टीस्पून
- कढिलिंब - ३-४
- हिरव्या मिरच्या - ३ बारीक चिरलेल्या
- कांदा - १ बारीक चिरलेला
- मीठ - स्वादानुसार
Instructions
डोस्याच्या पिठासाठी :
- तांदूळ स्वच्छ धुऊन त्यात एक दीड इंच वर राहील इतके पाणी घाला.
- त्यातच पोहे घालून सर्व ७-८ तास भिजत ठेवा.
- उडदाची डाळ धुऊन त्यातही एक दीड इंच वर राहील इतके पाणी घाला.
- उडदाच्या डाळीतच मेथीचे दणेही मिसळा. उडदाची डाळ व मेथी ही ७-८ तास भिजू द्या.
- ७-८ तास भिजल्यानंतर तांदूळ व डाळीवरचे पाणी वेगळे ओतून घेऊन पीठ दळताना वापरायला बाजूला काढून ठेवा.
- भिजलेले तांदूळ व डाळ मिक्सर मध्ये वेगवेगळे दळून अगदी बारीक करून घ्या. (दळण्यासाठी बाजूला काढून ठेवलेले पाणी बारीक दळायला आवश्यक असेल तेवढेच घाला.)
- आता दळून घेतलेले तांदूळ व डाळ एका उंच पातेल्यात एकत्र करून चांगले मिसळून घ्या. (पातेल्यात पिठाच्या वर पीठ फरमेन्ट झाल्यावर फुगून यायला भरपूर रिकामी जागा राहिली पाहिजे.)
- पातेले झाकून उन्हात किंवा घरातच उबदार ठिकाणी फरमेन्ट होण्यासाठी ठेऊन द्या.
- ८-१० तासांमध्ये पीठ चांगले फरमेन्ट होऊन फुगून वर येईल.
- पिठात थोडे (१/४-१/२ कप) पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून साधारण भज्याच्या पिठाप्रमाणे पातळ करून चांगले हालवून घ्या.
- बटाटे उकडून त्यांची सालं काढून घ्या व हातानेच फोडून त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्या.
- कढईत ४ टीस्पून तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, कढिलिंब, मिरच्या व कांदा घालून परतून घ्या. कांदा किंचित गुलाबी होईपर्यंत परता.
- त्यातच बटाट्याच्या फोडी घाला. गॅस बारीक ठेवा व मीठ घालून सर्व मिसळून घ्या.
- दोन मिनिटे परतून गॅस बंद करून टाका.
- तवा (शक्यतो नॉन-स्टिक) गरम करून त्याच्या मधोमध २-३ टेबलस्पून पीठ चमच्याने घाला व चमच्याच्या मागील बाजूने किंवा एका पळीने पीठ गोल गोल पसरत पातळ डोसा पसरून घ्या.
- डोस्याच्या कडेने व मधे साधारण १/२ टीस्पून तेल पसरून घाला.
- त्यावर आवडत असल्यास थोडी मोळगा पोडी (कोरडी साउथ इंडियन चटणी) ही पसरून घ्या.
- खालची बाजू गुलाबी रंगाची दिसेपर्यंत डोसा शिजवून घ्या.
- डोसा तव्यावरून सोडवून घ्या व मग डोस्याच्या मधे थोडा मसाला घालून डोसा मसाल्याभोवती दोन्हीकडून दुमडून घ्या.
- गरम गरम कुरकुरीत डोसा सांभार व कोणत्याही साऊथ इंडियन ओल्या चटणीबरोबर (नारळाची चटणी, टोमॅटोची चटणी, किंवा डाळीची चटणी) वाढा.