भरली वांगी रेसिपी
भरली वांगी ही भाजी महाराष्ट्रीयन जेवणातील एक खास भाजी आहे. अतिशय खमंग व चविष्ट अशी ही भाजी तुम्ही पोळीबरोबर ही खाऊ शकता पण शक्यतो ही भाजी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर वाढली जाते. आशा करते तुम्हाला ही सोपी व स्वादिष्ट रेसिपी आवडेल.
Ingredients
- कोळी व छोटी छोटी वांगी - ६
- दाण्याचे कूट - ५ टेबलस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - १ & १/४ टीस्पून (किंवा स्वादानुसार)
- काळा/गोडा मसाला - ३ टीस्पून
- गूळ - १ टेबलस्पून
- लसूण - १ टेबलस्पून बारीक कापलेला
- कांदा - १ छोटा बारीक चिरलेला
- तेल - १ & १/२ टेबलस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- कोथिंबीर (ऐच्छिक) - बारीक चिरलेली, वरून सजावटीसाठी
Instructions
- सगळी वांगी स्वच्छ धुऊन त्याची देठं कापून काढून टाका.
- एकावेळी एक वांगं घेऊन त्याला उभी व मधोमध एक चीर पाडा. चीर आर-पार जाऊ देऊ नका.
- आता वांगं ९० अंशांनी फिरवून पालथं करा व त्या बाजूला ही पाहिल्यासारखीच उभी चीर पाडून घ्या.
- अश्याच प्रकारे प्रत्येक वांग्याला वर एक आणि खाली एक अश्या दोन चिरा पाडून घ्या.
- सारणासाठी दाण्याचं कूट, मीठ, लाल तिखट, काळा मसाला व गूळ एकत्र करून घ्या.
- हे सारण प्रत्येक वांग्याच्या दोन्ही चिरांमध्ये भरून घ्या. उरलेले सारण थोड्यावेळ बाजूला ठेवा.
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग व हळद घाला व लगेच कापलेला लसूण व चिरलेला कांदा ही घाला.
- किंचित ब्राऊन दिसेपर्यंत लसूण व कांदा परतून घ्या.
- आता भरलेली सर्व वांगी कढईत ठेवा व हलकेच थोडीशी हालवून घ्या म्हणजे तेल वांग्यांना सगळीकडून लागेल.
- त्यावर अंदाजे ३/४ कप पाणी घाला व पाण्याला उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेऊन झाकण ठेवा व वांगी शिजू द्या.
- वांगी शिजून मऊ झाली की त्याचा रंग बदलेल.
- आता त्यावर बाजूला ठेवलेलं सारण घाला व परत १-२ मिनिटे शिजू द्या.
- अलगद हालवून गॅस बंद करा.
- वरून आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व ही चविष्ट भरली वांगी पोळी किंवा भाकरी बरोबर वाढा.