पिठलं रेसिपी
पिठलं हा एक अतिशय चविष्ट आणि झटपट बनवायचा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. खरं तर पिठलं बऱ्याच प्रकारे बनविता येते. एक पातळ, दुसरे मध्यम ओले, व तिसरे अगदी कोरडे. कोरड्या पिठल्याला 'झुणका' या नावाने ही ओळखले जाते. पिठलं भाकरी बरोबर किंवा पोळीबरोबर खायला छान लागते. पातळ पिठलं भातावर ही घेता येते व कोरडे पिठले म्हणजे झुणका प्रवासात किंवा डब्यात देण्यास ही उपयोगी पडते. इथे आपण चविष्ट आणि मध्यम-ओलसर पिठलं कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
Ingredients
- डाळीचे पीठ / बेसन - १ कप
- मीठ - चवीनुसार
- लाल तिखट - चवीनुसार
- तेल - १ टीस्पून पिठात घालायला आणि २ टीस्पून फोडणी साठी
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- कांदा (ऐच्छिक) - १ छोटा बारीक चिरलेला
- कोथिंबीर (ऐच्छिक) - बारीक चिरलेली, वरून पसरायला
Instructions
- २ कप पाण्यामध्ये बेसन तिखट, मीठ, आणि एक टीस्पून तेल घाला.
- गुठळ्या ना ठेवता चांगले कालवून घ्या व पातळसर पीठ तयार करून घ्या.
- २ टीस्पून तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यानंतर त्यात हिंग, व हळद घाला.
- आता त्यात वर तयार करून ठेवलेले पीठ (कृतिक्रमांक २) काळजीपुर्वक ओता.
- असेच गोलगोल चमच्याने हलवत रहा. थोड्या वेळातच पीठ घट्ट व्हायला लागेल.
- जेंव्हा पीठ आणखीन घट्ट व्हायचे बंद होईल तेंव्हा झाकण ठेऊन ५ मिनिटे शिजू द्या.
- ५ मिनिटांनी गॅस बंद करून आवडत असल्यास वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- गरम गरम पिठलं भाकरी किंवा पोळी बरोबर वाढा.