- Serving: ५ जणांसाठी
श्रीखंड रेसिपी
श्रीखंड हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध पक्वान्न! विशेषतः गुढी पाडवा (नवीन वर्ष) व दसऱ्याच्या सणाला घरोघरी बनविले जाते. हे बनवायला अगदीच सोपे आहे व बहुतेक करून २ स्वादांमध्ये बनवता येते. एक म्हणजे केशर व वेलदोडा घालून व दुसरं म्हणजे आंबा घालून. आंबा घालून बनविलेल्या श्रीखंडाला आम्रखंड ह्या नावाने ओळखले जाते. इथे मी केशर व वेलदोडा घालून केलेल्या श्रीखंडाची रेसिपी देत आहे.
Ingredients
- दही - ४ कप
- केशर - १/४ टीस्पून
- दूध - १ टीस्पून
- वेलदोड्याची पूड - आवडीप्रमाणे
- बदामाचे काप किंवा चारोळी (ऐच्छिक) - आवडीप्रमाणे
- साखर - चक्क्या एवढी (अंदाजे २ कप)
- जायफळ पावडर - आवडीप्रमाणे किंवा १ कप चक्क्यासाठी १/४ टीस्पून
Instructions
- ४ कप दही एका स्वच्छ कापडात घट्ट गुंडाळून टांगून ठेवावे.
- ७-८ तासांत हळू हळू त्यातील पाणी निघून जाईल.
- पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या दह्याखाली पातेले ठेवावे.
- आता ७-८ तासांनंतर, पाणी काढलेले दही म्हणजेच 'चक्का', मोजून घ्यावा व चक्क्याइतकीच साखर त्यात घालावी.
- साखर पूर्ण विरघळेपर्यंत चांगले हलवावे.
- केशर गरम दुधामध्ये १० मिनिटांसाठी भिजवून ठेवावे. व मग चक्का एका बारीक भोकांच्या गाळण्यातून किंवा पुरण वाटायच्या यंत्रातून गाळून घ्यावा.
- त्यात केशर भिजवलेले दूध, जायफळ पावडर, व वेलदोड्याची पूड (चवीप्रमाणे) घालून पुन्हा एकदा चांगले मिसळावे.
- तयार श्रीखंड फ्रीज मध्ये ठेवावे.
- वाढताना त्यावर बदामाचे काप किंवा चारोळ्या घालून पुरी बरोबर वाढावे.