- Serving: २ जणांसाठी
उपासाचे थालीपीठ रेसिपी
थालीपीठ हा एक खमंग महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो ब्रेकफास्टला किंवा नाष्ट्याला खायला फारच रुचकर लागतो. तसेच हे उपासाचे थालीपीठ सुद्धा उपासाच्या दिवशी खायला फारच खमंग व चवदार लागते. ह्यासाठी लागणारे पीठ म्हणजेच 'उपासाची भाजणी', घरी बनवायला अगदी सोपी आहे व फ्रीज मध्ये बरेच महिने टिकते.
Ingredients
- (अंदाजे ७ कप) भाजणीसाठी -
- वऱ्याचे तांदूळ - २ & १/२ कप
- राजगिरा - १ & १/४ कप
- साबुदाणा - ३/४ कप
- जिरे - २ टेबलस्पून
- थालीपीठासाठी -
- उपासाची भाजणी - १ & १/२ कप
- बटाटा - १ उकडून साल काढलेला
- हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट - बारीक ठेचलेल्या मिरच्या किंवा लाल तिखट, चवीप्रमाणे
- मीठ - चवीप्रमाणे
- दाण्याचे कूट - १/२ कप
- कोथिंबीर - १/४ कप, बारीक चिरलेली
- जिरे - १/४ टीस्पून
- तेल - आवश्यकतेनुसार अंदाजे ३-४ टीस्पून
Instructions
भाजणीसाठी (अंदाजे ७ कप भाजणीसाठी):
- जिरे गडद रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या व बारीक दळून त्याची मिक्सर मध्ये पूड करून घ्या. पूड मिक्सर मधेच राहू द्या.
- राजगिरा किंचित गुलाबी रंगावर भाजून, तो ही जिऱ्याची पूड असलेल्या मिक्सर मध्ये काढून घ्या.
- साबूदाणा ही किंचित गुलाबी रंगावर भाजून घ्या व त्याच मिक्सर मध्ये काढा.
- वऱ्याचे तांदूळ गुलाबी रंगावर भाजून त्याच मिक्सर मध्ये काढा.
- भाजलेले मिक्सर मधील सर्व पदार्थ गार झाल्यावर त्याचे अगदी बारीक पीठ, म्हणजेच 'भाजणी' दळून घ्या.
- उपासाची भाजणी लगेच वापरायला तयार आहे. लगेच वापरायची नसल्यास ही भाजणी फ्रीज मध्ये बरेच महिने सुद्धा टिकेल.
थालीपीठ बनवायची कृति:
- १ & १/२ कप भाजणी एका तसराळ्यात काढून घ्या.
- उकडलेला बटाटा कुस्करून भाजणीत मिसळा.
- त्यात मीठ, तिखट किंवा मिरची, दाण्याचे कूट, कोथिंबीर, व जिरे घाला.
- सर्व मिसळून, लागेल तसे पाणी घालून, कणके प्रमाणे मऊ मळून घ्या.
- तवा गरम करायला ठेवा.
- कृतिक्रमांक ४ मधे तयार केलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन, हाताने थापून एका पार्चमेन्ट पेपर वर त्याचे गोल थालीपीठ थापून घ्या.
- त्यावर एका बोटाने ४-५ भोके पाडून घ्या.
- आता पार्चमेन्ट पेपर उलटा करून थालीपीठ अलगद हातावर काढून घ्या.
- आणि गरम तव्यावर टाका.
- प्रत्येक भोकांत व थालिपीठाच्या कडेने थोडे थोडे तेल सोडा.
- झाकण ठेऊन, थालिपीठाच्या खालच्या बाजूवर किंचित गुलाबी डाग दिसे पर्यंत, थालीपीठ मध्यम आचेवर शिजू द्या.
- आता उलतन्याने थालीपीठ उलटून टाका.
- परत थोडे थोडे तेल भोकात व कडेने सोडा व थालिपीठाची दुसरी बाजू ही गुलाबीसर दिसेपर्यंत भाजा.
- तव्यावरून काढून तयार उपासाचे थालीपीठ उपासाच्या लोणच्याबरोबर व दह्याबरोबर वाढा.
- अश्याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाची ही थालीपीठे करून घ्या.