लिंबाचे लोणचे रेसिपी
लोणची व चटण्या जेवणाची चव वाढवायला नेहमीच मदत करतात. त्यातीलच एक प्रसिद्ध लोणचे म्हणजे लिंबाचे लोणचे. हे लोणचे घरी बनवायला अगदी सोपे आहे. शिवाय ह्याच्यात तेल घालायची ही गरज नाही. आणि फ्रीज मध्ये ठेवल्यास तर हे लोणचे वर्षभर सुद्धा चांगले टिकते. रोज वापरण्यासाठी मी हे लोणचे एका छोट्या बरणीत काढून बाहेरच ठेवते आणि जास्तीचे लोणचे फ्रीज मध्ये. आवडत असल्यास तुम्ही ह्या लोणच्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे ही घालू शकता पण तसे केल्यास लोणच्यात लाल तिखट घालू नका.
Ingredients
- लिंबं - ५-६ मोठी
- तेल - १/४ टीस्पून पेक्षा कमी
- मेथी दाणे - १/२ टीस्पून
- हिंग - १/२ टीस्पून
- हळद - १ टीस्पून
- लाल तिखट - २ टीस्पून
- मोहरीची डाळ - ३/४ टेबलस्पून
- मीठ - खाली कृतीत दिल्याप्रमाणे
- साखर (ऐच्छिक) - स्वादानुसार
Instructions
- सगळी लिंबं पाण्याने स्वच्छ धुऊन व पुसून कोरडी करून घ्या.
- आता आपल्या आवडीप्रमाणे त्यांचे मोठे किंवा छोटे तुकडे करून घ्या.
- आता लिंबाच्या फोडीचे ६ एक सारखे ढीग करून घ्या.
- त्यातील एका ढिगाएवढे मीठ मोजून बाजूला काढून घ्या.
- मोहरीची डाळ मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
- एका छोट्या कढईत अगदी थोडेसे तेल घालून त्यात मेथी दाणे गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या.
- आता गॅस बारीक करून मेथी दाणे बाजूला काढून घ्या.
- व त्याच कढईत हिंग, हळद, आणि कृतिक्रमांक ५ मधील मोहरीची डाळ घाला व सगळे थोडेसे परतून घ्या. (परतताना गॅस अगदी बारीक असावा. )
- आता कृतिक्रमांक ७ मधील मेथी दाण्यांची बारीक पावडर करून घ्या.
- लिंबाच्या फोडी एका वेगळ्या तसराळ्यात काढून घ्या वा त्यात कृतिक्रमांक ८ मधील हिंग, हळद, आणि मोहरीची पावडर व कृतिक्रमांक ९ मधील मेथीची पावडर घाला.
- त्यात मोजून बाजूला ठेवलेले मीठ (कृतिक्रमांक ४) आणि लाल तिखट घाला.
- सगळे चांगले मिसळून एका प्लास्टिक किंवा काचेच्या बरणीत भरून २ दिवस (४८ तास) तसेच राहू द्या.
- तिसऱ्या दिवशी ह्याला खूप रस सुटला असेल. परत एकदा सगळे वर खाली करून लोणच्याची चव बघा.
- जर तुम्हाला जास्त आंबट वाटत असेल तर चवीपुरती थोडी साखर घाला. नसेल तर फ्रिज मध्ये ठेऊन द्या.
- हे लोणचे फ्रीजमध्ये वर्षभर तरी छान टिकते.