कैरीची चटणी रेसिपी
इथे दिलेली कैरीची चटणी ही कैरीच्या दिवसांमध्ये अगदी झटपट बनवायची चटणी आहे. ह्यासाठी लागणारे दाण्याचे कूट आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये बहुतेक तयारच असते. ते तयार असल्यास ही चटणी अगदी पटकन बनवून पोळीबरोबर किंवा सँडविच मध्ये लावून खायला फारच चविष्ट लागते.
Ingredients
- कैरी - १/२ कप किसलेली
- मीठ - स्वादानुसार
- लाल तिखट - १/२ टीस्पून किंवा स्वादानुसार
- गूळ - १ टेबलस्पून किंवा कैरी जास्त आंबट असल्यास आणखीन थोडा जास्त
- दाण्याचे कूट* - ३ टीस्पून
Instructions
- कैरी, मीठ, तिखट, दाण्याचे कूट* व गूळ सर्व एकत्र मिसळून घ्या किंवा सर्व मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- गूळ विरघळल्यावर तयार चटणीला २-३ आठवड्यांपर्यंत फ्रीज मध्ये ठेवा.
- वापरायच्या वेळी थोड्यावेळ बाहेर काढून ठेवा व पोळी बरोबर किंवा सँडविच साठी वापरा.
*दाण्याचे कूट : दाण्याच्या कुटासाठी दाणे काळे डाग पडेपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्या. गार झाल्यावर हाताने चोळून त्यांची साले काढा व दाणे पाखडून घ्या. आता सालं काढलेल्या दाण्यांचे मिक्सर मध्ये किंवा फूड प्रोसेसर मध्ये किंचित भरड असे कूट करून घ्या. अश्या प्रकारे बनवलेले दाण्याचे कूट जास्त प्रमाणात बनवून ठेवले म्हणजे बऱ्याच महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये पटकन वापरता येते.