- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 30 minutes
- Serving: अंदाजे तीन जणांसाठी
साबूदाण्याची खिचडी रेसिपी
उपासासाठीं सगळ्यात प्रसिद्ध व आवडीचा पदार्थ म्हणजे साबूदाण्याची खिचडी. जर साबूदाणा योग्य पद्धतीने भिजवलेला असला व दाण्याचे कूट ही तयार असले तर ही खिचडी अगदी झटकन व छान बनविता येते. तोंडी लावायला साबूदाण्याच्या खिचडी बरोबर लिंबाचे उपासाचे लोणचे व दही किंवा ताक जरूर द्यावे.
Ingredients
- साबूदाणा - १ & १/२ कप
- बटाटा - १ मोठा
- दाण्याचे कूट - १ कप
- मीठ - चवीनुसार
- साखर - २ टीस्पून
- तेल किंवा तूप - ४ टीस्पून
- जिरे - १ टीस्पून
- हिरव्या मिरच्या - २ बारीक चिरलेल्या किंवा ठेचलेल्या
- खवलेले ओले खोबरे (ऐच्छिक) - आवडीप्रमाणे
- कोथिंबीर - बारीक चिरलेली, आवडीप्रमाणे सजावटीसाठी
Instructions
- साबुदाणा १-२ वेळा पाण्याने धुऊन पाणी काढून टाकावे व परत साधारण १/२ सें. मी. साबुदाण्याच्या वर पाणी राहील असे पाणी घालून, साबूदाणा कमीतकमी ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवावा. भिजल्यानंतर साबूदाणा फुगेल व त्यातील सगळे पाणी शोषून घेईल.
- बटाटा धुऊन घ्यावा व त्याच्या पातळ चकत्या करून घ्याव्यात.
- भिजलेल्या साबूदाण्यात दाण्याचे कूट, मीठ, व साखर घालून मिसळून घ्यावे.
- एका कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात जिरे घालावेत. त्यावर हिरव्या मिरच्या घालाव्यात. (मिरच्यांचे तुकडे असल्यास तेलात टाकाव्यात पण ठेचलेल्या असल्यास कृतिक्रमांक ५ मध्ये घालाव्यात.)
- आता त्यात बटाट्याच्या चकत्या घालून २ मिनिटे परतून मग झाकून ठेवाव्यात व शिजू द्याव्यात.
- आता शाबूदाणा घालून सगळे चांगले मिसळून घ्यावे. (ठेचलेल्या मिरच्या वापरल्यास ह्या वेळी घालाव्यात.)
- थोडेसे हातानी पाणी शिंपडावे व गॅस अगदी मंद ठेवून खिचडीवर झाकण ठेवावे व खिचडी साबुडण्याचा रंग बदले पर्यंत (किंचित गुलाबी होईपर्यंत) शिजू द्यावी. मधे मधे हलवायला विसरू नये, नाहीतर खिचडी कढईच्या तळाला लागेल.
- गॅस वर शिजवल्यास खिचडी खाली लागायची थोडी भीती असते. ती टाळण्यासाठी तुम्ही एका मायक्रोवेव्ह सेफ बाउल मध्ये झाकण ठेवून मायक्रोवेव्ह मध्ये ही खिजडी शिजवू शकता.
- वरून आवडत असल्यास ओले खोबरे व कोथिंबीर घालून गरम साबूदाण्याची खिचडी वाढावी.
- बरोबर उपासाचे लोणचे व दही किंवा ताक ही वाढावे.