- Serving: ३०-३५ चिरोटे
चिरोटे रेसिपी
चिरोटे हे एक खूपच आकर्षक व चवदार मिष्टान्न आहे जे बहुतेक दिवाळीच्या दिवसांमध्ये बनविले जाते. इथे दिलेल्या कृतीत साधे किंवा फुलांच्या आकाराचे चिरोटे कसे बनवायचे ते दिले आहे. खरं म्हणजे चिरोटे हे पांढरे स्वच्छ ही छान दिसतात पण कधीतरी खायचा रंग ही मिसळला तर रंगीत चिरोटेही आकर्षक दिसतात.
Ingredients
- मैदा - १ & १/२ कप
- तेल - ३ टेबलस्पून व तळण्यासाठी आणखीन
- मीठ - एक चिमूट
- आरारूट पावडर किंवा कॉर्नफ्लोअर - ६ टीस्पून
- तूप - ३ टीस्पून
- खायचा रंग (ऐच्छिक) - आवडीप्रमाणे
- पिठीसाखर - आवडीप्रमाणे वरून पसरायला
Instructions
- मैद्यामध्ये मीठ, ३ टेबलस्पून गरम तेल, व हवा असल्यास खायचा कोणताही रंग घाला.
- पाण्याने मैदा घट्ट भिजवून घ्या (पुरीच्या कणकेप्रमाणे). १५ मिनिटे झाकून ठेवा.
- झाकून ठेवलेल्या मैद्याचे साधारण १" मोठे भाग करून घ्या. एकूण भाग ४ च्या पटीत असावेत. म्हणजे एकूण भाग ४, ८, १२, १६, वगैरे असावेत. त्याकरिता लागेल तसा प्रत्येक भाग थोडा कमी किंवा जास्त मोठा करून घ्यावा.
- प्रत्येक भाग हाताने गोल करून चपटा करावा.
- आरारूट पावडर मध्ये (किंवा कॉर्नफ्लोअर मध्ये) तूप घालून चांगले मिसळून गोळा करून घ्या.
- आरारूटचे ही छोटे छोटे एकसारखे भाग करून घ्यावेत. मैद्याचे जितके भाग केलेत त्याच्या अर्धे आरारूटचे भाग करावेत. म्हणजे मैद्याचे १२ भाग केले असल्यास अरारूटचे ६ भाग करावेत, किंवा मैद्याचे ८ भाग केले असल्यास आरारूटचे ४ भाग करावेत.
- एका रुंद कढईत तेल गरम करायला ठेवावे. चांगले तापल्यावर आच बारीक-मध्यम ठेवावी.
- आता मैद्याचे २ भाग घ्यावेत. त्यातील एका भागावर आरारूटचा १ भाग ठेवून पसरावा. त्यावर मैद्याचा दुसरा भाग ठेऊन कडा घट्ट बंद कराव्यात.
- हाताने दाबून त्याची पातळ पोळी लाटून घावी.
- ही पोळी दोनदा अर्धी दुमडून त्रिकोणी करावी व थोड्यावेळ बाजूला ठेवावी.
- आता कृतिक्रमांक ८ प्रमाणेच मैद्याचे आणखीन २ भाग व आरारूटचा १ भाग घेऊन अजून एक तशीच (कृतिक्रमांक ९ प्रमाणे) पोळी लाटावी.
- आता ह्या दुसऱ्या पोळीवर कढईतले अगदी थोडेसे गरम तेल घालून पोळीवर सगळीकडे हाताने पसरावे.
- आता पहिली पोळी त्यावर उघडून पसरावी.
- व त्यावरही कढईतले गरम तेल घालून हाताने पसरावे.
- दोन्ही पोळ्या एकत्र गुंडाळून एक लांब गुंडाळी करावी.
- या गुंडाळीचे सुरीने एकसारखे १" मोठे भाग कापून घ्यावेत.
- असे सर्व मैद्याचे व आरारूटचे गुंडाळ्या करून १" मोठे काप करून घ्यावेत.
- येथून पुढे आवडीप्रमाणे फुलांच्या आकाराचे किंवा चौकोनी चिरोटे, खाली दिल्याप्रमाणे करावेत.
फुलासारख्या चिरोट्यासाठी :
- आता (कृतिक्रमांक १७ मधील) एक भाग घेऊन तो पोळपाटावर, कापलेली बाजू वर व खाली येईल असा उभा ठेवावा.
- हाताने दाबून चपटा करावा व लाटून त्याचा पुरीप्रमाणे पातळ चिरोटा लाटावा.
- गरम तेलात टाकून झाऱ्याने त्याच्या मधोमध तेल उडवीत चिरोटा तळावा.चिरोट्याच्या मध्ये तेल उडवल्यावर त्याचे पदर सुटतील व फुलाप्रमाणे सुटे होतील. किंचित गुलाबी दिसू लागताच चिरोटा बाहेर काढावा. (चिरोट्याचा रंग जवळजवळ स्वच्छ पांढराच असायला हवा. त्यामुळे किंचित गुलाबी दिसू लागताच जास्तीचे तेल निथळून चिरोटा पेपर टॉवेल वर काढावा.)
चौकोनी चिरोट्यासाठी :
- आता (कृतिक्रमांक १७ मधील) एक भाग घेऊन तो पोळपाटावर आडवा ठेवावा. कापलेल्या बाजू उजवीकडे व डावीकडे येतील असा.
- हाताने दाबून घ्यावा व त्याची चौकोनी पातळ पुरी लाटावी.
- आता खाली दिलेल्या व्हिडिओ प्रमाणे हा चिरोटा तेलात किंचित गुलाबीसर दिसेपर्यंत तळून घ्यावा :
- चिरोटा खूप गुलाबी होऊ देऊ नये. स्वच्छ पांढराच दिसायला हवा.
- जास्तीचे तेल निथळून चिरोटा एका पेपर टॉवेलवर काढावा.
डब्यात ठेवण्यासाठी :
- सर्व चिरोटे वरील दिलेल्या कोणत्याही पद्धतीने लाटून व तळून झाल्यावर पूर्ण गार होऊ द्यावेत.
- पूर्ण गार झाल्यावर झाल्यावर त्यांवर पिठीसाखर पसरावी व एका एअर टाइट डब्यात घट्ट बंद करून ठेवावेत.