नान (यीस्ट शिवाय)
नान हा एक प्रसिद्ध उत्तरभारतीय ब्रेडचा प्रकार आहे जो बहुतेक मैद्यापासून बनवला जातो व छोले, राजमा, दालमाखनी या सारख्या उत्तरभारतीय पदार्थांबरोबर गरमगरमच वाढला जातो. नान अधिक पौष्टिक बनविण्यासाठी अर्धा मैदा व अर्धी कणीक किंवा संपूर्ण कणीक वापरायला ही हरकत नाही. या रेसिपी मध्ये मी यीस्ट चा वापर केलेला नाही. त्यामुळे यीस्ट घातल्यावर पीठ जितके फुलून येते तितके फुलणार नाही पण तयार नान मात्र अगदी मऊ व चविष्ट बनतील. नानमध्ये काळे तीळ (म्हणजे हिंदीत कलौंजी), किंवा लसूण-कोथिंबिरीची मिश्रण घालणे ऐच्छिक आहे व तसेच वरून लोणी लावणे ही. नान बनविताना लसूण-कोथिंबिरीचे मिश्रण घातल्यास गार्लिक-नान बनेल!
Ingredients
- मैदा - ३ कप
- मीठ - ३/४ टीस्पून
- बेकिंग पावडर - १ टेबलस्पून
- बेकिंग सोडा - १/४ टीस्पून
- दूध - २ टेबलस्पून
- साखर - २ टीस्पून
- दही - ३ टेबलस्पून
- तेल - १ & १/२ टेबलस्पून
- लोणी (ऐच्छिक) - नानला वरून लावायला
- काळे तीळ (ऐच्छिक) - १/२ टीस्पून
- बारीक चिरलेली कोथिंबीर व लसणाचे छोटे काप यांचे मिश्रण (ऐच्छिक) - दोन्ही मिळून अंदाजे ३-४ टेबलस्पून
Instructions
- मैदा, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व १ टेबलस्पून तेल एका तसराळ्यात मिसळून घ्या.
- एका पातेल्यात दही, दूध, साखर व १/२ कप पाणी मिसळून घ्या.
- आता कृतिक्रमांक २ मधील मिश्रण कृतिक्रमांक १ मधील तसराळ्यातील मिश्रणात मिसळा व आवश्यक असल्यास आणखीन पाणी वापरून मऊसर कणीक मळून घ्या.
- १/२ टेबलस्पून तेल घालून परत एकदा हलकेच मळून घ्या.
- ओल्या पातळ कापडाने झाकून निदान ३-४ तास ही कणीक एका उबदार ठिकाणी फेरमेंटशन साठी ठेऊन द्या.
- ३-४ तासांनी कणीक फुलून अगदी मऊ होईल. परत एकदा हलकेच मळून त्याचे आवडतील त्या आकाराचे एकसारखे भाग करून घ्या.
- एक भाग घेऊन आधी थोडे लाटा. त्यात आवडत असल्यास काळे तीळ किंवा लसूण-कोथिंबिरीचे मिश्रण पसरा व दोनदा दुमडून त्रिकोणी करून घ्या. (लाटताना वरून लावायला मैदा किंवा कणीक वापरण्यास हरकत नाही.)
- आता परत लाटून १/२-३/४ सें. मी. जाड व त्रिकोणी, गोलाकार किंवा अंडाकार लाटून घ्या .
- वरच्या बाजूस हाताने थोडेसे पाणी लावून, पाणी लावलेली बाजू खाली करून, तयार नान गरम तव्यावर टाका.
- मध्यम आचेवर ठेऊन वरती छोटे छोटे फुगवटे दिसेपर्यंत तव्यावरच ठेवा.
- आता नान तव्यावरून काढा व उलटा करून, एका पापड भाजायच्या जाळीवर ठेऊन गॅसवर काळपट डाग दिसे पर्यंत चांगला भाजून घ्या.
- वरून थोडे लोणी लाऊन गरम गरम नान छोले, राजमा, दाल माखनी वगैरे पदार्थांबरोबर वाढा.
- कणकेच्या बाकीच्या भागांचेही असेच नान बनवा व गरमच वाढा.