
- Cook Time: ६० minutes
- Serving: १० कचोऱ्यांसाठी
कचोरी
कचोरी ही उत्तर भारतातील 'चाट' या प्रकारच्या खाद्यपदार्थांपैकी एक खास पदार्थ आहे. ह्याला 'खस्ता कचोरी' असेही म्हणतात. 'खस्ता' म्हणजे कुरकुरीत'. ह्या काचोरीचे बाहेरचे कवच एकदम कुरकुरीत असते व बऱ्याच वेळ असेच छान कुरकुरीत राहायला हवे. कचोरीच्या आतल्या सारणासाठी तुम्ही मुगाची, उडदाची किंवा तुरीची डाळ वापरू शकता. किंवा मटारचे सारण ही छान लागते. बाकीची सामग्री व कृति खाली दिल्याप्रमाणेच आहे.
गरम गरम कुरकुरीत कचोरी सर्व्ह करण्यासाठी तुम्ही याचे सारण १-२ दिवस आधी तयार करून फ्रीज मध्ये ठेवले तरी चालेल. किंवा सर्व्ह करायच्या काही तासांपूर्वी कचोऱ्या भरून तयार ठेवल्या तरी ऐनवेळेला गरम गरम तळून सर्व्ह करता येतील. सर्व्ह करताना बरोबर हिरवी चटणी व गोड चिंचेची चटणी ही द्यावी. 'चाट' सारखी द्यायची असल्यास वरून थोडे दही व बारीक शेव घालून द्यावी.
Ingredients
- कचोरीच्या कवचासाठी :
- मैदा - २ कप
- मीठ - १ टीस्पून
- तेल - ३ टेबलस्पून
- कचोरीच्या सारणासाठी:
- मुगाची डाळ / उडदाची डाळ / तुरीची डाळ - ३/४ कप
- तेल - २ टेबलस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हिरव्या मिरच्या - ३ बारीक ठेचलेल्या
- धन्याची पूड - १ टीस्पून
- गरम मसाला - १ & १/४ टीस्पून
- आमचूर - १ & १/२ टीस्पून
- बडीशेप - २ tsp थोडी कुटलेली
- मीठ - स्वादानुसार
- तेल - तळण्यासाठी
Instructions
कचोरीच्या कवचासाठी:
- ३ टेबलस्पून तेल गरम करून मैद्यात घाला.
- त्यात मीठ घालून पाण्याने मैदा पुरीप्रमाणे घट्ट भिजवून घ्या.
- भिजवलेला मैदा १५-२० मिनिटे झाकून ठेवा.
कचोरीच्या सारणासाठी:
- ३-४ तासांसाठी डाळ पाण्यात भिजत ठेवा.
- सगळं पाणी काढून टाकून डाळ ग्राइंडर किंवा फूड प्रोसेसर मध्ये भरड वाटून घ्या.
- एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात हिंग व मिरच्या घाला.
- त्यातच वाटलेली डाळ घालून सगळे मिसळून घ्या.
- त्यावर बाकीचे मसाले म्हणजे गरम मसाला, धन्याची पूड, मीठ, आमचूर व बडीशेप ही घाला.
- आता गॅस बारीक ठेवा व सतत हालवत हे सारण मोकळे व कोरडे होईपर्यंत परता व गॅस बंद करा.
- आता सारण गार होऊ द्या.
कचोरी भरायची कृति:
- भिजवलेल्या मैद्याचे एकसमान १० भाग करून घ्या. प्रत्येक भाग हाताने गोल करून चपटा करून घ्या.
- त्याच प्रमाणे सारणाचे ही एकसारखे १० भाग करून घ्या.
- मैद्याचा एक गोळा घेऊन त्याची दुप्पट आकाराची पुरी लाटून घ्या.
- सारणाचा एक भाग पुरीवर ठेवा व पुरी सगळीकडून वर आणून, पुरीचे तोंड वरून घट्ट बंद करून घ्या.
- हलकेच कचोरी हाताने चपटी करून एकसारखी करण्यापुरती हलकेच अगदी थोडीशी लाटून घ्या.
- मैद्याच्या उरलेल्या गोळ्यांचे व उरलेल्या सारणाच्या ही अशाच प्रकारे कचोऱ्या करून घ्या.
- एका वेळेला ३-४ कचोऱ्या गरम तेलात घालून मंद आचेवर सगळ्या कचोऱ्या गुलाबी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्या.
- गरमागरम कचोऱ्या हिरव्या व गोड चटणीबरोबर किंवा दही व शेव घालून सर्व्ह करा.
- किंवा गार झाल्यावर एका एयर टाइट डब्यात भरून ठेवा व सर्व्ह करायच्या वेळी मायक्रोवेव किंवा ओव्हन मध्ये गरम करून सर्व्ह करा.