- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 20 minutes
- Serving: २ जणांसाठी
मक्याचा उपमा रेसिपी
मक्याचा उपमा / मक्याची उसळ हा नाष्ट्यासाठी बनवायला एक खूपच चविष्ट पदार्थ आहे. इथे दिलेल्या रेसिपी मध्ये आवडत असल्यास इतर काही पदार्थ, जसे चिरलेला कांदा, आलं, वगैरे ही घातले तरी चालेल पण मला स्वतःला असे वाटते की हे सर्व घातल्यामुळे मक्याची मूळ चव लागत नाही. म्हणून मी कमीत कमी मसाले व इतर फ्लेवर असलेले पदार्थ वापरून ही रेसिपी तयार केली आहे.
Ingredients
- मक्याची कणसं (ताजी कणसं किंवा फ्रोझन मक्याचे दाणे) - ३ कप
- तेल - २ & १/२ टेबलस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ - १/२ टीस्पून
- कढिलिंब - ४-५
- हिरव्या मिरच्या (ठेचलेल्या) - ३ छोट्या किंवा चवीप्रमाणे
- मीठ - चवीनुसार
- साखर (ऐच्छिक) - आवडीप्रमाणे
- लिंबाचा रस - १ टीस्पून
- कोथिंबीर - बारीक चिरलेली, सजावटीसाठी
Instructions
- एका सुरीने मक्याचे दाणे काढून घ्या. (किंवा कणीस किसून घेतले तरी चालेल.) (फ्रोझन कणसाचे दाणे वापरत असल्यास ही स्टेप वगळावी.)
- फूड प्रोसेसर वापरून मक्याचे दाणे भरड वाटून घ्यावेत. (कणसं किसून घेतल्यास ही स्टेप वगळावी.)
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, कढिलिंब, व ठेचलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात.
- थोडेसे परतून, किसलेले किंवा भरड वाटलेले मक्याचे दाणे घालावेत.
- सगळे हालवून मध्यम-बारीक आचेवर, सारखे हालवून, दाण्यांचा ओलसरपणा पुष्कळ कमी होईपर्यंत शिजवावेत. (ह्यासाठी साधारण १५ - २० मिनिटे लागतील.)
- मीठ, साखर (स्वीट कॉर्न वापरल्यास साखर घालू नये), व लिंबाचा रस घालून सर्व मिसळावे व गॅस बंद करावा.
- वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मक्याचा उपमा सर्व्ह करावा.