- Serving: ४ थालीपीठांसाठी
भाजणीचे थालीपीठ रेसिपी
थालीपीठ हा महाराष्टातला एक खमंग व झटपट तयार होणारा नाष्ट्याचा पदार्थ आहे. ह्यासाठी लागणारे पीठ म्हणजे थालिपीठाची भाजणी वेगवेगळी धान्ये वापरून बनविली जाते व शक्यतो दळण्यासाठी गिरणी वर दिली जाते. परंतु घरी जर एखादा हेवी ड्युटी मिक्सर किंवा छोटी विजेची गिरणी असेल तर ही भाजणी घरी सुद्धा बनविता येईल. ह्या थालीपिठात भोपळा, गाजर, दुधी, किंवा बारीक चिरून मेथीची पाने ही घालता येतील. लाल भोपळा किंवा दुधी घातल्यास त्याच्या फोडी मिक्रोवेव मध्ये थोड्या उकडून व मग कुस्करून घालाव्यात. ह्या थालीपिठात भाजलेले व साल काढून कुस्करून घातलेले वांगेही छान लागते.
Ingredients
- भाजणीसाठी (१० कप भाजणी साठी)
- जोंधळे / ज्वारी - २ कप
- बाजरी - २ कप
- गहू - २/३ कप
- तांदूळ - २/३ कप
- हरभऱ्याची डाळ - २/३ कप
- उडदाची डाळ - २/३ कप
- धने - १/२ कप
- थालीपिठासाठी (४ मध्यम आकाराच्या थालीपिठांसाठी))
- थालीपिठाची भाजणी - २ कप
- मीठ - स्वादानुसार
- लाल तिखट - स्वादानुसार
- काळा / गोडा मसाला - १ टेबलस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- कांदा - १ छोटा / १/२ कप चिरलेला
- कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरलेली
- आपल्या आवडीच्या भाज्या (ऐच्छिक) - १/२ कप किसलेल्या किंवा उकडून कुस्करलेल्या
- तेल - २ टीस्पून तेल भाजणीत घालायला व आणखीन आवश्यकतेनुसार)
Instructions
भाजणीसाठी :
- भाजणीच्या साहित्यात दिलेले सर्व पदार्थ खाली दिल्याप्रमाणे वेगवेगळे भाजून घ्या.
- जोंधळे, बाजरी, आणि गहू भाजल्यावर तडतडायला लागतील व फुटायला सुरवात होईल. तसे व्हायला लागल्यावर गॅस बंद करा.
- तांदूळ, हरभऱ्याची डाळ व उडदाची डाळ तिन्ही वेगवेगळ्या गुलाबी रंगाच्या होईपर्यंत भाजून घ्या.
- धने ही खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्या. गुलाबी होईपर्यंत थांबायची गरज नाही.
- आता सगळे भाजलेले पदार्थ गिरणीतून किंवा एखाद्या हेवी ड्युटी मिक्सर मधून बारीक दळून घ्या. असे तयार झालेले पीठ म्हणजे थालीपिठाची भाजणी. ही भाजणी फ्रीज मध्ये वर्षभर सुद्धा टिकते.
थालीपिठाची कृति:
- थालीपिठासाठी लागणारे सर्व साहित्य पाण्याने मळून घेऊन मऊसर गोळा तयार करा (भिजवताना १ टेबलस्पून तेल ही भाजणीत घाला.) अंदाजे २ कप भाजणीसाठी मी १ & १/४ कप पाणी वापरले. (भाजणी जुनी असल्यास कोमट पाण्याने भिजवावी, म्हणजे थालीपीठ मऊसर होईल.)
- एका पोळपाटावर पार्चमेन्ट पेपर लाऊन घ्या.
- भाजणीच्या गोळ्यातील साधारण ५ इंच मोठा गोळा घेऊन पोळपाटाच्या मध्यभागी ठेवा.
- आता हाताने सगळीकडून थापत पातळ (३-४ मि. मी. जाड) थालीपीठ थापून घ्या. थापाताना हाताला चिकटत असेल तर हात पाण्यात बुडवून मग थापा.
- बोटाने थालीपिठाच्या मधे एक व कडेनी ३-४ भोके पाडून घ्या.
- तवा गरम करून मध्यम आचेवर ठेवा व १/२ टीस्पून तेल तव्यावर सोडा.
- आता परचमेंट पेपरवरून थालीपीठ आधी अलगद हातावर काढून घ्या व मग गरम तव्यावर टाका.
- थालीपिठाच्या प्रत्येक भोकात थोडे थोडे तेल घाला.
- झाकण ठेवून वरील बाजू कोरडी दिसेपर्यंत व खालील बाजूस थोडे ब्राउन डाग पडेपर्यंत शिजू द्या.
- झाकण काढून थालीपीठ पालथे करा.
- दुसरीकडूनही डाग दिसेपर्यंत थालीपीठ भाजून घ्या व गरम थालीपीठ दही, लोणी व कोणत्याही लोणच्याबरोबर वाढा.
- अश्याच पद्धतीने उरलेल्या भाजणीचीही थालीपिठे तयार करून घ्या.