- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 30 minutes
- Serving: ३ जणांसाठी
पालकाची पातळभाजी रेसिपी
पालकाची ही पातळभाजी चिंच व गूळ घालून बनविलेली आंबटगोड व अतिशय चविष्ट भाजी आहे. ह्याच प्रमाणे अळूची भाजी ही बनविता येते. पालकाची पातळभाजी ताक घालून सुद्धा बनविली जाते पण त्याची चव निराळी असते. इथे आपण चिंचगुळाची पातळभाजी कशी बनवायची ते पाहूया.
Ingredients
- पालक - ४ कप (गच्च भरून)
- हरभऱ्याची डाळ - १ टेबलस्पून
- शेंगदाणे - २ टेबलस्पून
- तेल - ३ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- जिरे - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून पेक्षा कमी
- हळद - १/४ टीस्पून
- मेथी दाणे - १/४ टीस्पून
- कढिलिंब - ४-५
- मीठ - स्वादानुसार
- लाल तिखट - स्वादानुसार
- चिंचेचा दाट कोळ - १ टीस्पून
- गूळ - २ टेबलस्पून
- काळा / गोडा मसाला - २ टीस्पून
- डाळीचे पीठ / बेसन - १ टेबलस्पून
Instructions
- पालकाची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
- हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे एका कुकरच्या भांड्यात काढून घ्या.
- दाणे व डाळ भिजेपर्यंत त्यात पाणी घाला.
- त्यावर चिरलेला पालक घाला.
- एक शिट्टी येईपर्यंत कुकरमध्ये शिजवून घ्या. एका शिट्टीनंतर गॅस बारीक करून २-३ मिनिटे ठेवून बंद करा.
- कुकर गार झाल्यावर शिजलेला पालक बाहेर काढा.
- त्यातील सर्व पाणी सावकाश बाजूला काढून ठेवा.
- डाळीचे पीठ घालून पळीने किंवा चमच्याच्या मागील बाजूने चांगले घोटून घ्या.
- कृतिक्रमांक ७ मध्ये बाजूला ठेवलेले पाणी त्यात परत घाला व हवे असल्यास आणखीन थोडे पाणी घालून पातळ करून घ्या. (खूप पातळ करू नये. ही भाजी दाटसरच असते.)
- त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, चिंचेचा कोळ, गूळ, व काळा मसाला घाला.
- एका पातेल्यात तेल गरम करून घ्या व त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे, हिंग, हळद, मेथी दाणे, व कढिलिंब घाला.
- गॅस बारीक करून त्यात कृतिक्रमांक १० मध्ये तयार करून ठेवलेले पालकाचे मिश्रण ओता.
- मधे मधे हालवत उकळी येऊ द्या.
- गरम पातळभाजी पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर वाढा.