- Serving: ५ जणांसाठी
मसाले भात रेसिपी
मसाले भात म्हणजेच महाराष्ट्रीय व्हेजिटेबल पुलाव. मसाले भातासाठी आवश्यक असलेला काळा / गोडा मसाला घरी बनवायला अगदी सोपा आहे व आधीपासून तयार करून ठेवता येतो. किंबहुना प्रत्येक महाराष्ट्रीयन स्वयंपाकघरात हा मसाला तयार असतोच. शक्यतो मसाले भातात कोणतीही एक भाजी घातली जाते, बहुधा वांगी किंव्हा तोंडली. पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गाजर, डब्बू मिर्ची, मटार, वगैरे इतर भाज्या ही घालू शकता.
Ingredients
- तांदूळ - १ & १/४ कप
- जिरे - १ & १/२ टीस्पून
- किसलेले खोबरे - ३ टेबलस्पून
- तेल किंवा तूप - ३/४ टेबलस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- कढिलिंब - ४-५
- आल्याची पेस्ट किंवा किसलेले आले - १ & १/४ टीस्पून
- हिरव्या मिरच्या (ठेचलेल्या) - २-३
- तोंडली - १ कप उभी चिरलेली
- मीठ - चवीनुसार
- काळा / गोडा मसाला - १ टेबलस्पून
- साखर - १ टीस्पून
- कोथिंबीर (बारीक चिरलेली) (ऐच्छिक) - सजावटीसाठी
- ताजे खवलेले खोबरे (ऐच्छिक) - सजावटीसाठी
Instructions
- तांदूळ स्वच्छ धुऊन पाणी काढून टाकावे.
- जिरे व किसलेले खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे.
- भाजलेले जिरे व खोबरे भरड वाटून बाजूला ठेवावे.
- एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, कढिलिंब, आल्याची पेस्ट, व ठेचलेल्या मिरच्या घालाव्यात.
- किंचित परतून त्यात धुतलेले तांदूळ व तोंडल्याच्या फोडी घालाव्यात.
- आणखीन २ मिनिटे परतून त्यात २ & १/२ कप पाणी घालावे.
- त्यात मीठ, साखर, जिरे-खोबऱ्याची पूड (कृतिक्रमांक ३ मधील), व गोडा मसाला घालावा.
- पाण्याला उकळी येऊ द्यावी. (लवकर उकळी येण्यासाठी कृतिक्रमांक ६ मधे गरम पाणी घालावे.)
- पाणी तसेच उकळत ठेऊन तांदूळापर्यंत येऊ द्यावे व मग गॅस बारीक करून झाकण ठेवावे.
- असेच मंद आचेवर पाणी संपेपर्यंत भात शिजू द्यावा व गॅस बंद करावा.
- वरून चिरलेली कोथिंबीर व खवलेले खोबरे घालून गरम मसाले भात वाढावा.