- Serving: चार जणांसाठी
रगडा पॅटिस
रगडा पॅटिस हे 'चाट' पद्धतीचे एक चटपटीत स्नॅक आहे. रगडा म्हणजेच पांढऱ्या वाटाण्याची उसळ व पॅटीस म्हणजे बटाट्याचे कटलेट. हे पोटभरीचे तोंडाला पाणी आणणारे स्नॅक घरी जरूर बनवून बघा.
Ingredients
- रगड्यासाठी :
- पांढरे वाटणे - १ कप
- कांदा - १ कांदा मोठा मोठा चिरलेला
- टोमॅटो - १ टोमॅटो मोठा मोठा चिरलेला
- आलं - एक ते दीड इंच मोठा तुकडा
- लसूण - ४-५ मोठ्या पाकळ्या
- गरम मसाला - ३ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट (ऐच्छिक) - चवीप्रमाणे
- तेल - ४ टीस्पून
- पॅटिस साठी :
- बटाटा - ५ मोठे बटाटे, उकडून सालं काढलेले
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - चवीप्रमाणे
- मैदा - २ & १/२ टेबलस्पून
- तेल - शॅलो फ्राय साठी आवश्यकतेनुसार
- सर्व्ह करण्यासाठी :
- कांदा - १ बारीक चिरलेला
- टोमॅटो - १ बारीक चिरलेला
- चिंचेची गोड चटणी - आवडीप्रमाणे
- हिरवी चटणी (कोथिंबिरीची किंवा पुदीन्याची) - आवडीप्रमाणे
- शेव - आवडीप्रमाणे
Instructions
रगड्यासाठी :
- पांढरे वाटणे रात्रभर किंवा ६-७ तास पाण्यात भिजवून ठेवा.
- भिजवलेले पाणी काढून १ & १/२ कप नवीन पाणी घाला. त्यातच मीठ घालून प्रेशर कुकर मध्ये एक शिट्टी येईपर्यंत शिजवा. एक शिट्टी आल्यानंतर गॅस १५ मिनिटांसाठी बारीक करून ठेवा व मग बंद करा.
- कुकर गार झाल्यावर शिजलेले वाटणे बाहेर काढा.
- कांदा, टोमॅटो, आलं व लसूण मिक्सर मध्ये पूर्ण वाटून प्यूरी करून घ्या.
- ४ टीस्पून तेल गरम करून त्यात वरील प्यूरी घाला.
- गरम मसाला व लाल तिखट ही त्यातच घाला.
- प्युरी ब्राऊन दिसेपर्यंत व कडेने तेल सुटायला लागेपर्यंत तेलात परतून घ्या.
- त्यात शिजवलेले वाटणे घालून, मिसळून घ्या व उकळी येऊ द्या. (जरूर वाटल्यास थोडे आणखीन पाणी घाला पण रगडा खूप पातळ करू नका.)
पॅटिस साठी :
- उकडलेले बटाटे कुस्करून घ्या.
- त्यात मैदा, मीठ, व लाल तिखट घालून मिसळून घ्या.
- वरील सारणाचे साधारण दोन इंच मोठे भाग घेऊन त्याचे गोल गोल पॅटीस तयार करून घ्या.
- किंचित खोलगट तवा घेऊन त्यावर थोडे तेल घाला व त्यात मावतील इतके पॅटिस ठेवा.
- पॅटिसची खालची बाजू खमंग ब्राउन झाल्यावर पॅटिस उलटून टाका.
- आता दुसरी बाजू ही ब्राउन होऊ द्या.
- दोन्ही बाजूने ब्राउन झाल्यावर सगळे पॅटिस पेपर टॉवेल वर काढून घ्या.
- इतर सर्व पॅटिस ही तव्यावर असेच शॅलो फ्राय करून घ्या.
सर्व्ह करताना :
- एका खोलगट ताठलीत २-३ पॅटिस ठेऊन त्यावर पॅटिस बुडेपर्यंत गरम गरम रगडा घाला.
- वरून आवडीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चिंचेची गोड चटणी, हिरवी चटणी (कोथिंबिरीची चटणी किंवा पुदिन्याची चटणी), व शेव घाला.
- गरम गरम रगडा पॅटिस शेव मऊ पडायच्या आत लगेच सर्व्ह करा.