- Prep Time: 30 minutes
- Cook Time: 60 minutes
- Serving: ३०-३५ लहान आकाराच्या करंज्यांसाठी
ओल्या नारळाची करंजी रेसिपी
करंजी हे दिवाळीच्या फराळातील एक खास पक्वान्न आहे. ह्यातील नारळाचे सारण आवडीप्रमाणे कोरडे किंवा ओले करता येते. इथल्या व्हिडिओ मध्ये व खाली लिहिलेल्या कृतीमध्ये मी ओल्या नारळाच्या करंजीची रेसिपी दिली आहे.
Ingredients
- करंजीच्या कव्हर साठी :
- रवा - ३/४ कप
- मैदा - ३/४ कप
- दूध - १/२ ते ३/४ कप
- तेल - २ & १/२ टेबलस्पून करंजीच्या कव्हर साठी + तळण्यासाठी
- मीठ - १ चिमूट (ऐच्छिक)
- सारणासाठी :
- ताजं खवलेलं खोबरं - २ कप
- साखर - १ & १/४ कप
- तांदुळाची पिठी - १ & १/२ टीस्पून
- बेदाणे - ३०-३५
- वेलदोड्याची पूड - आवडीप्रमाणे
Instructions
कवचासाठी :
- रवा पूर्ण ओला होईल इतकेच दूध घालून (अंदाजे ६ टेबलस्पून) रवा अर्धा तास भिजत ठेवा.
- त्यात मैदा घालून, चिमूटभर मीठ, व २ & १/२ टेबलस्पून गरम तेल घाला. आणखीन लागेल त्याप्रमाणे दूध घालून (अंदाजे ४ टेबलस्पून) पुरीच्या कणकेप्रमाणे घट्ट भिजवून घ्या.
- झाकून निदान १५ मिनिटे तरी ठेवा.
सारणासाठी :
- ओले खोबरे व साखर एकत्र करून बारीक ते मध्यम आचेवर शिजायला ठेऊन मधे मधे हालवत रहा.
- आधी साखर विरघळेल व त्यातच खोबरे शिजायला सुरवात होईल.
- साधारण पाच मिनिटांनी खोबऱ्याचा रंग बदलेल व पातेल्याच्या तळाशी दिसणारा पाक दिसेनासा होईल. तसे झाल्यावर त्यात तांदुळाची पिठी, वेलदोड्याची पूड व बेदाणे घाला.
- सर्व मिसळून गॅस बंद करा.
- हे सारण पूर्ण गार होऊ द्या.
पुढील कृति :
- कवचासाठी तयार केलेल्या कणकेचे अर्धा ते एक इंच मोठे एकसारखे भाग करून घ्या.
- त्यांचे गोळे करून हाताने दाबून चपटे करून ठेवा.
- त्यांतील एक भाग घेऊन त्याची अगदी पातळ पुरी लाटून घ्या.
- त्याच्या मधोमध साधारण दीड टेबलस्पून सारण ठेऊन पुरी दुमडा व कडा बोटाने दाबून घट्ट बंद करून टाका.
- आता करंजीची कड कातण्याने कापून घ्या किंवा दुमड घालून बंद करा.
- असेच कणकेचे सर्व भाग वापरून करंज्या तयार करून घ्या.
- कढईत तेल गरम करून सर्व करंज्या छोट्या छोट्या बॅचेस मधे गुलाबी रंगाच्या होईपर्यंत तळून काढा.
- पेपर टॉवेल वर काढून पूर्ण गार होऊ द्या व मग एका एअर टाइट डब्यात भरून ठेवा.