- Serving: ४ जणांसाठी, ६ इंच व्यासाची ८ थालीपिठे
साबुदाणा थालीपीठ
थालीपीठ हा महाराष्ट्रातला अतिशय रुचकर व झटपट होणारा खाद्यपदार्थ. साधे थालीपीठ जरी वेगवेगळ्या धान्यांचे बनविले जात असले तरी हे साबुदाण्याचे थालीपीठ वेगळे असून ते उपासाच्या दिवशी ही चालेल असे आहे. साबुदाणा भिजवायला लागणारे ३ तास वगळले तर हे थालीपीठ अगदी झटपट तयार होते. मात्र त्यासाठी लागणारे दाण्याचे कूट ही तयार असायला हवे. हे गरम थालीपीठ शक्यतो दही, लोणी, व उपासाच्या गोड लोणच्याबरोबर वाढावे.
Ingredients
- साबुदाणा - १ & १/२ कप
- दाण्याचे कूट - १ & १/२ कप
- बटाटा - १ मध्यम आकाराचा
- जिरे - २ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- हिरव्या मिरच्या (ठेचलेल्या) - चवीप्रमाणे
- साखर - १/२ टीस्पून
- तेल - आवश्यकतेनुसार
Instructions
- साबुदाणा पाण्याने २ वेळा धुऊन घ्यावा.
- साबुदाणा बुडेल इतकेच पाणी त्यात घालून भिजत ठेवावा.
- कमीतकमी ३ तास तरी साबुदाणा भिजू द्यावा.
- भिजल्यानंतर साबुडण्यातील सर्व पाणी संपेल व साबुदाणा फुलून मोठा होईल.
- त्यात दाण्याचे कूट, जिरे, मीठ, साखर, व हिरव्या मिरच्या घाला.
- बटाट्याची सालं काढून किसून घ्या व साबुदाण्यात घाला.
- हाताने चांगले मळून घ्या. वाटल्यास थोडे पाणी घाला व हाताने मळून गोळा तयार करून घ्या.
- एका पोळपाटावर पार्चमेन्ट पेपर लावून घ्या व तवा गरम करायला ठेवा.
- साबुदाण्याच्या गोळ्याचा एक संत्र्याएवढा भाग घेऊन पोळपाटाच्या मधोमध ठेवा.
- आता सगळीकडून एकसारखे थापत थापत त्याचे गोलाकार व साधारण १/२ से. मी . जाड असे थालीपीठ थापून घ्या. थापताना हाताला चिकटत असल्यास हात पाण्यात बुडवून मग थापा.
- थालीपिठात एक मध्ये व कडेने ३-४ भोके करून घ्या.
- आता पार्चमेन्ट पेपर सावकाश उचलून थालीपीठ हातावर काढून घ्या व गरम तव्यावर टाका.
- प्रत्येक भोकात व कडेने १/४ टीस्पून तेल सोडा.
- झाकण ठेवून २-३ मिनिटे थालीपीठ मध्यम आचेवर शिजू द्या. खालच्या बाजूला थोडे डाग दिसायला लागल्यावर दुसऱ्या बाजूला उलटून टाका.
- दुसरीकडे ही असेच डाग दिसू लागल्यावर तव्यावरून काढून घ्या.
- असेच उरलेल्या गोळ्याची (कृतिक्रमांक ७) ही थालिपिठे बनवून घ्या.
- गरम गरम साबुदाण्याचे थालीपीठ लोणी, दही व उपासाच्या लोणच्याबरोबर वाढा.