- Serving: ३०-३५ अनर्स्यांसाठी
अनरसा रेसिपी
अनरसा हा दिवाळीच्या फराळातील एक खूपच खमंग आणि वेगळा पदार्थ आहे. विशेषतः लक्ष्मी पूजनासाठी बनविले जाणारे अनरसे कुरकुरीत व चविष्ट लागतात. अनरस्यासाठी लागणारे पीठ हे साधारण दसरा झाला की बनविले जाते म्हणजे त्याला दिवाळीपर्यंत मुरायला वेळ मिळतो. ह्यात तुम्ही गूळ किंवा साखर काहीही घालू शकता पण गुळाचे अनरसे जास्त खमंग लागतात, असे मला वाटते. अनरस्याचे पीठ फ्रीझर मध्ये ठेवल्यास वर्ष दोन वर्षे सुद्धा चांगले टिकते.
Ingredients
- तांदूळ - १ कप
- गूळ - १ कप किसलेला
- तूप - अंदाजे १ टेबलस्पून हाताला लावण्यासाठी
- खसखस - अंदाजे ४ टेबलस्पून
- तेल किंवा तूप - तळण्यासाठी
- पिकलेलं केळ (गरज वाटल्यास) - एक छोटा तुकडा (अंदाजे एक इंच मोठा)
- पिठीसाखर (गरज पडल्यास) - १-२ टीस्पून
Instructions
- तांदूळ पाण्याने एक डॉन वेला धुऊन तीन दिवस भिजत घाला. दर चोवीस तासांनी त्याचे पाणी बदला. उदाहरणार्थ जर तुम्ही शुक्रवारी सकाळी तांदूळ भिजत घातले असतील तर सोमवारी सकाळी ते पुढील कृतीसाठी तयार होतील.
- भिजवलेले तांदूळ एका रोळीत काढून घ्या. सर्व पाणी निथळून गेल्यावर रोळीखाली एक जाड टॉवेल किंवा किचन टॉवेलची एक घडी ठेवा. तांदुळात उरलेले जास्तीचे पाणी टॉवेल मध्ये शोषले जाईल. टॉवेल पूर्ण भिजला की नवीन टॉवेलची घडी ठेवा. जोपर्यंत टॉवेल ओला व्हायचा थांबत नाही तोपर्यंत ५-५ मिनिटांनी बदलत रहा. (साधारण २-३ वेळा टॉवेल बदलावा लागेल.)
- टॉवेल भिजेनासा झाला की तांदुळाचे मिक्सर मध्ये वाटून अगदी बारीक पीठ करून घ्या.
- हे पीठ आता चाळणीने चाळून घ्या. थोडेसे न वाटलेले तांदूळ चाळणीत वर राहतील. ते परत वाटून घ्या व परत चाळून घ्या. असे सर्व तांदूळ वाटून घ्या.
- पिठात किसलेला गूळ घाला आणि सर्व चांगले मिसळून घ्या.
- आता हे तयार पीठ झाकण लावलेल्या डब्यात ठेऊन निदान एक आठवडा (२ ते ३ आठवाड्यांपर्यंत) मुरायला ठेवा. २-३ आठवड्यांनंतर पीठ थोडेसे घट्ट होईल. (मुरल्यानंतर हे पीठ फ्रीझर मध्ये ठेवल्यास १-२ वर्षे सुद्धा छान राहते.)
- अनरसे करताना जर पीठ जरा कोरडे वाटले तर त्यात थोडंसं केळ (१ चमचाभर) कुस्करून मिसळा.
- बोटांना थोडेसे तूप लाऊन घ्या.
- पिठाचा थोडासा भाग (साधारण एक इंच मोठा) घेऊन त्याचा हातांमध्ये फिरवून गोल करून घ्या.
- अंदाजे १/२ टीस्पून खसखस पोळपाटावर पसरून त्यावर पिठाचा गोळा ठेवा.
- कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करायला बारीक-मध्यम आचेवर ठेवा.
- आता खाली दाखविल्याप्रमाणे बोटांनी फिरवीत अनरसा थापून घ्या.
- सावकाश अनरसा उचलून वरील व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे गरम तेलात सोडा. खसखस चिकटलेली बाजू तळताना वर असायला हवी.
- झाऱ्याने अनरस्याच्या मधोमध हळूहळू तेल उडवा. त्यामुळे अनरस्यावर छोटी छोटी भोकं पडून एकसारखी जाळी तयार होईल.
- सोनेरी रंग येताच अनरसा बाहेर काढून घ्या. एक अनारसा तळायला साधारण ४५ सेकंद लागतील. जर अनरसा लवकर लाल होत असेल तर गॅस जरा बारीक करून तेल थोडे गार होऊ द्या व मग तळा.
- तळल्यानंतर अनरसा मऊ असतो. तो पेपर टॉवेल लावलेल्या एका रोळीत उभा राहील असा ठेवा.
- गार झाल्यावर अनरसा कडक व कुरकुरीत होईल.
- तळल्यावर अनरस्यावर जाळी पडायला हवी. जर जाळी पडत नसेल तर पिठात थोडी थोडी पिठीसाखर घालून परत तळून पाहावे.
- अश्या प्रकारे सगळ्या पिठाचे अनरसे थापत थापत तळून घ्या.
- पूर्ण गार झाल्यावर अनरसे एका एअर टाइट डब्यात भरून ठेवा.