- Serving: २०-२५ करंज्यांसाठी
खाजाची रंगीत करंजी
खाजाच्या करंज्या किंवा साट्याच्या करंज्या हा एक कारंजीचा अतिशय आकर्षक प्रकार आहे. वरून पदर सुटलेल्या ह्या करंज्यांमध्ये जर वेगवेगळे रंग वापरले तर ह्या आणखीनच सुरेख दिसतात. खाजाच्या करंज्या बनवायची कृति जरा मोठी नक्कीच आहे परंतु अवघड नाही. खाली दिलेल्या सूचनांप्रमाणे व व्हिडिओ प्रमाणे तुम्हाला ह्या सहजपणे बनवून बघता येतील.
Ingredients
- कवचासाठी :
- मैदा - १ & १/४ कप
- बारीक रवा - ४ टीस्पून
- तेल - २ टेबलस्पून कवचासाठी व तळण्यासाठी आणखीन
- मीठ - १/४-१/२ टीस्पून
- दूध किंवा पाणी - अंदाजे १/२ कप किंवा आवश्यकतेनुसार
- खायचे तीन वेगवेगळे रंग (रंग १, रंग २ व रंग ३) - आवश्यकतानुसार
- कॉर्न फ्लोर / आरारूट पावडर - ६ टीस्पून
- तूप - ३ टीस्पून
- तांदुळाची पिठी - लाटताना वरून लावायला
- सारणासाठी :
- ताजं खवलेलं खोबरं - १ & १/२ कप
- साखर - १ कप
- तांदुळाची पिठी - १ टीस्पून
- वेलदोड्याची पूड - आवडीप्रमाणे
Instructions
कवचासाठी :
- कॉर्नफ्लोर व तूप एकत्र करून चांगले फेटून घ्या व कणकेप्रमाणे त्याचा मऊसर गोळा तयार करून घ्या. ह्या मिश्रणाचे एक समान आठ भाग करून थोड्यावेळ बाजूला ठेवा.
- मैद्याचे एकसारखे चार भाग करून घ्या. (इथे एकूण १ & १/२ कप मैदा मी वापरला आहे त्यामुळे प्रत्येक भाग अंदाजे १/४ कपापेक्षा थोडा मोठा होईल.)
- त्यातील एक भाग मोजून एका तसराळ्यात घ्या व त्यात १ टीस्पून बारीक रवा, १/२ टेबलस्पून गरम तेल, व चिमूटभर मीठ घाला. दूध किंवा पाणी वापरून त्याची पुऱ्यांच्या कणकेप्रमाणे घट्ट कणीक मळून घ्या. ही कणीक झाकून ठेवा.
- तसेच मैद्याच्या दुसऱ्या भागात ही १ टीस्पून बारीक रवा, १/२ टेबलस्पून गरम तेल व चिमूटभर मीठ घाला.
- पाण्यात किंवा दुधात खायचा एक रंग घालून त्याने मैद्याच्या दुसऱ्या भागाची रंगीत व घट्ट कणीक भिजवून घ्या.
- त्याचप्रमाणे (कृतिक्रमांक ३ व ४ प्रमाणे) मैद्याच्या उरलेल्या दोन भागांची ही दुसऱ्या व तिसऱ्या रंगांची कणीक भिजवून घ्या.
- अश्या पद्धतीने एकूण चार रंगांची कणीक तयार होईल - एक पांढरी, व तीन वेगवेगळ्या रंगांच्या.
- प्रत्येक कणकेचे एक समान चार भाग करून घ्या व सर्व थोड्यावेळ झाकून ठेवा.
सारणासाठी :
- खोबरे व साखर एकत्र करून एका पातेल्यात शिजायला ठेवा.
- मध्यम आचेवर सतत हलवत शिजू द्या.
- सारणातले जवळ जवळ सर्व पाणी संपायला लागले की सारण तयार होत आले असे समजावे. (असे व्हायला साधारण ३-४ मिनिटे लागतील.)
- मग गॅस बारीक करून त्यात तांदुळाची पिठी घालावी व एखादा मिनिट आणखीन शिजवून गॅस बंद करावा.
- त्यातच वेलदोड्याची पूडही घालावी व सर्व मिसळून सारण पूर्ण गार होऊ द्यावे.
पुढील कृति :
- ज्या तेलात करंज्या नंतर तळायच्या आहेत, ते तेल गरम करायला मध्यम आचेवर ठेवावे.
- पांढऱ्या कणकेचा एक भाग घेऊन त्यावर तूप-कॉर्नफ्लोर मिश्रणाचा एक भाग पसरावा.
- त्यावर पांढऱ्या कणकेचा दुसरा भाग ठेऊन कड बंद करावी.
- दोन्ही बाजूला थोडी पिठी लाऊन अगदी पातळ पोळी लाटावी.
- ह्या पोळीची दोनदा हलकी घडी घालून बाजूला ठेवा.
- ह्याचप्रमाणे (कृतिक्रमांक २ ते ५ प्रमाणे), रंग १ व रंग २ ह्या कणकेच्या ही तूप-कॉर्नफ्लोर चे साटे मधे ठेऊन पोळ्या लाटून, त्या घडी करून बाजूला ठेवाव्यात.
- रंग ३ कणकेचीही अशीच (कृतिक्रमांक २ ते ४) पोळी लाटून घ्यावी.
- आता ह्या पोळीवर कढईतले थोडे कोमट तेल घालून हाताने पोळीवर पसरावे.
- त्यावर पांढऱ्या पोळीची घडी उलगडून ठेवावी व त्यावरही थोडे गरम तेल पसरावे.
- अश्याच प्रकारे त्यावर बाकीच्या २ रंगांच्या लाटलेल्या पोळ्या ही उलगडून घालाव्यात. प्रत्येक पोळीवर कढईतले गरम तेल पसरून लावावे.
- आता ह्या चारही पोळ्या एकत्र गुंडाळून त्याची घट्ट गुंडाळी करावी.
- ह्या गुंडाळीचे साधारण दीड इंच मोठे असे भाग कापावेत.
- उरलेल्या रंगीत कणकेचेही अश्याच पद्धतीने गुंडाळी करून भाग करून घ्यावेत. (कृतिक्रमांक २ ते १७) व थोड्यावेळ कढईखालचा गॅस बंद करावा.
- कृतिक्रमांक १७ मधील एक भाग घेऊन त्याची कापलेली बाजू वर करून पोळपाटावर ठेवावी व हाताने दाबून त्याची पातळ पुरी लाटावी.
- त्यामध्ये मावेल इतके सारण ठेऊन, मध्ये दुमडावी व कड घट्ट बंद करून करंजी तयार करावी.
- कातण्याने कड कापून घ्यावी व करंजी एका ताठलीत ओलसर फडक्याने झाकून ठेवावी.
- कृतिक्रमांक १७ मधील प्रत्येक भागाची अश्या पद्धतीने करंजी तयार करून झाकून ठेवावी.
- आता कढईतले तेल परत गरम करून मध्यम आचेवर सर्व करंज्या किंचित गुलाबी होईपर्यंत तळून काढाव्यात. तळल्यावर ह्या करंज्यांचे पदर सुटलेले दिसून येतील.
- करंज्या एका पेपर टॉवेलवर काढून घ्याव्यात व पूर्ण गार झाल्यावर एका हवा-बंद डब्यात भरून ठेवाव्यात.