- Cook Time: 0day 0 h 30 min
- Serving: ११ मोदकांसाठी
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक खाल्ल्याशिवाय गणपतीच्या सणाची पूर्तता होऊ शकत नाही. उकडीच्या मोदकांचे बाहेरचे कवच तांदुळाची पिठी उकडून त्यापासून बनविले जाते. हे उकडलेले तांदुळाचे पीठ म्हणजेच 'उकड'. आतील सारणासाठी ताजे खवलेले खोबरे व गूळ ह्याचे मिश्रण असते. हे मोदक फ्रीज मध्ये ४-५ दिवस टिकतील. पण दर वेळी फ्रीजमधून काढून कुकर मध्ये वाफवून गरम करून मगच खावेत. तर आता हे चविष्ट मोदक कसे बनवायचे ते पाहूया. गणपती बाप्पा मोरया!
Ingredients
- कवचासाठी :
- तांदुळाची पिठी - १ कप
- तेल - अंदाजे १ & १/२ टेबलस्पून
- मीठ - एक चिमूट
- सारणासाठी :
- ताजे खवलेले ओले खोबरे - १ & १/२ कप
- गूळ - १ & १/४ कप
- खसखस - १ & १/२ टीस्पून भाजलेली
- वेलदोड्याची पूड - स्वादानुसार
Instructions
सारणासाठी :
- खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजायला ठेवा.
- सतत हालवत रहा. पहिल्यांदा गूळ विरघळेल, मग त्यातच खोबरे शिजून सारण थोडे घट्ट होण्यास मदत होईल. गुळाचा पुष्कळसा ओलसरपणा कमी झाल्यावर गॅस बंद करा.
- सारणामध्ये भाजलेली खसखस व वेलदोड्याची पूड घाला.
- सर्व मिसळून सारण गार होण्यासाठी ठेवा.
कवचासाठी :
- एका कढईत १ कप पाणी, १ टीस्पून तेल व चिमूटभर मीठ घालून उकळायला ठेवा.
- उकळी आल्यावर गॅस बारीक करा व त्यात एका हाताने थोडी थोडी पिठी घाला व दुसऱ्या हाताने हालवत ठेवा.
- सर्व मिसळून झाल्यावर झाकण ठेवा व दोन तीन मिनिटे बारीक आचेवर शिजू द्या. मधे एकदा हलवायला विसरू नका.
- दोन तीन मिनिटे चांगली वाफ आल्यावर गॅस बंद करून टाका. ही शिजविलेले पिठी म्हणजे 'उकड'.
- एक टेबलस्पून पाणी व एक टेबलस्पून तेल एका वाटीत मिसळून घ्या.
- हे तेल व पाण्याचे मिश्रण थोडे थोडे उकडीवर घालून उकड गरम असतानाच एखाद्या मॅशर किंवा वाटीच्या मागच्या बाजूने चांगली मळून कणकेसारखी मऊ करून घ्या.
- ही मळून झालेली उकड झाकून कोमट होईपर्यंत ठेऊन द्या.
पुढील कृति:
- उकड कोमट झाल्यावर त्याचा अंदाजे दीड इंच मोठा गोळा घेऊन त्याची बोटांनी दाबत दाबत वाटी करून घ्या.
- आता वाटीला कडेनी निऱ्या पाडून घ्या.
- त्यात १-२ टीस्पून सारण घाला.
- आता सगळीकडून उकड वर आणून वाटीचे तोंड घट्ट बंद करून टाका.
- ह्या मोदकाला एका पाण्याच्या भांड्यात बुडवून मग एका तेल लावलेल्या भांड्यात ठेवा.
- अश्या प्रकारे सर्व मोदक तयार करून तेल लावल्या भांड्यात ठेऊन घ्या.
- मोदकाचे भांडे प्रेशर कुकर मध्ये ठेऊन, प्रेशर न ठेवता, साधारण दहा मिनिटे सर्व मोदक वाफवून घ्या.
- सगळे मोदक वाफवून झाल्यावर गरम गरम मोदक तुपाबरोबर वाढा.