- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 15 minutes
- Serving: ४ जणांसाठी
पोहे
महाराष्ट्रातील प्रसिद्ध, खमंग, व सोपा न्याहरीचा पदार्थ म्हणजे पोहे. पोह्यांमध्ये तुम्ही नुसता कांदा किंवा नुसता बटाटा घालून कांदे पोहे किंवा बटाटे पोहे बनवू शकता. किंवा दोन्ही कांदा व बटाटा व शिवाय मटारही घालून हा चविष्ट पदार्थ तयार करू शकता. वरून सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर व शिवाय थोडी बारीक शेवही घालून पहा. बाजारात तीन प्रकारचे पोहे मिळतात. पातळ, मध्यम जाड व जाड. हे पोहे बनविण्यासाठी मध्यम जाड पोहे वापरावेत.
Ingredients
- मध्यम जाड पोहे - २ कप
- तेल - २ टेबलस्पून
- मोहरी - १ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- कढिलिंब - ५-६
- हिरव्या मिरच्या - २-३ उभ्या चिरलेल्या
- बटाटा - १ सोलून पातळ काप केलेला
- कांदा - १ बारीक चिरलेला
- हिरवे मटार - १/४ कप
- मीठ - चवीप्रमाणे
- साखर - १ & १/२ टीस्पून
- लिंबाचा रस - १ & १/२ टीस्पून
- कोथिंबीर - सजावटीसाठी बारीक चिरलेली
Instructions
- एका रोळीमध्ये पोहे धुऊन घ्यावेत व जास्तीचे पाणी निथळायला १० मिनिटे ठेऊन द्यावेत.
- कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, कढिलिंब, मिरच्या व बटाटे घालून सर्व मिसळावे.
- बटाटे दोन मिनिटे परतून थोडे गुलाबी झाल्यावर कढईवर झाकण ठेऊन बटाटे मंद आचेवर २ मिनिटे शिजवून मऊ करून घ्यावेत.
- आता बारीक चिरलेला कांदा घालून २ मिनिटे परतून घ्यावा.
- भिजवून ठेवलेले पोहे त्यात घालून सर्व नीट मिसळावे. त्यातच मटार, मीठ, साखर, आणि लिंबाचा रस घालावा.
- आता हातानेच अंदाजे २ मुठी पाणी घेऊन पोह्यांवर एकसारखे शिंपडावे.
- सर्व मिसळून, झाकण ठेऊन, अगदी बारीक गॅस वर पोहे पाच मिनिटे शिजू द्यावेत. पण मध्ये एक दोनदा हलवायला विसरू नये.
- गॅस बंद करून, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून गरम गरम पोहे वाढावेत. (वरून बारीक शेव पसरूनही पोहे छान लागतात.)