- Prep Time: 15 minutes
- Cook Time: 30 minutes
- Serving: १५ पोळ्यांसाठी
गुळाची पोळी
गुळाची पोळी हे तर संक्रांतीचे खास पक्वान्न. गुळानी बनविलेली ही पातळ व कुरकुरीत पोळी थंडीच्या दिवसांत खायला फारच रुचकर लागते. गुळाची पोळी शक्यतो घट्ट तुपाबरोबर खातात. ही पोळी ७-८ दिवस छान टिकेल. व फ्रीजमधे ठेवल्यास आणखीन काही दिवस.
Ingredients
- कव्हर साठी :
- गव्हाचे पीठ (कणीक) - १ & १/२ कप
- मैदा - १/२ कप
- डाळीचे पीठ / बेसन - १/२ कप
- गरम तेल - २ टेबलस्पून
- तूप - १/२ टीस्पून
- तांदुळाची पिठी - अंदाजे १/४ कप
- गुळाच्या फिलिंगसाठी :
- गूळ - १ कप किसलेला
- खसखस - १/२ टेबलस्पून भाजलेली
- वेलदोड्याची पूड - १/२ टीस्पून
- डाळं - १/४ कप
- तेल - आवश्यकतेनुसार अंदाजे २-३ टीस्पून
Instructions
पोळीच्या कव्हर साठी :
- गव्हाचे पीठ, मैदा व बेसन एका तसराळ्यात मिसळून घ्या.
- २ टेबलस्पून तेल गरम करून वरील मिश्रणात घाला.
- त्यातच तूप ही घाला व पाण्याने घट्टसर (पुऱ्यांच्या कणकेप्रमाणे) भिजवून घ्या.
गुळाच्या फिलिंगसाठी :
- २ कप गुळामध्ये १ टेबलस्पून भाजलेली खसखस घालून त्यात वेलदोड्याची पूड ही घाला.
- मिक्सर मध्ये डाळं बारीक वाटून घ्या व गुळात मिसळा. (डाळ्याच्या ऐवजी १/२ कप बेसन २ टेबलस्पून तेलावर भाजून घेऊन तेही घालू शकता. त्यासाठी खाली दिलेली चित्रे पाहावीत.)
- गूळ हाताने चांगला मळून पेढ्याप्रमाणे मऊ करून घ्या.
- मळताना मऊ करण्यासाठी आणखीन थोडे तेल ही वरून लावायला हरकत नाही.
पुढील कृति :
- कणकेचे एक ते दीड इंच मोठे चपटे गोळे करून घ्या.
- गुळाचेही त्याच आकाराचे चपटे गोळे करून घ्या.
- गुळाचा एक गोळा कणकेच्या २ गोळ्यांच्या मध्ये ठेवा व कडेने बंद करून घ्या. पूर्ण कड बंद न करता मधे मधे थोड्या उघड्या जागा ठेवा.)
- तयार गोळ्याला दोन्ही बाजूंनी तांदुळाची पिठी लाऊन पातळ पोळी लाटून घ्या.
- लाटलेली पोळी गरम तव्यावर टाका व दोन्ही बाजूंवर एकसारखे ब्राउन डाग दिसेपर्यंत भाजून घ्या.
- अश्या पद्धतीने सर्व कणकेच्या व गुळाच्या पोळ्या लाटून व भाजून घ्या.
- भाजून झाल्यावर सर्व पोळ्या गार करायला पसरून ठेवा.
- चविष्ट गुळाची पोळी घट्ट तुपाबरोबर वाढा.