दोडक्याच्या शिरांची चटणी
दोडक्याची भाजी केली कि त्याबरोबर दोडक्याच्या शिरांची खमंग चटणी आलीच. भाजी करताना दोडक्याच्या शिरा फेकून द्यायच्या ऐवजी त्या वाळवून त्यांची ही कोरडी व कुरकुरीत चटणी करून डब्यात भरून ठेवावी व कधीही जेवणात वापरावी.
Ingredients
- दोडक्याच्या शिरा व सालं - १/४ कप (वाळल्यानंतर)
- तेल - १ & १/२ टीस्पून
- मोहरी - १/४ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- हिरव्या मिरच्या (ठेचलेल्या) - २ मध्यम आकाराच्या किंवा चवीप्रमाणे
- तीळ - १/२ टीस्पून
- किसलेले सुके खोबरे - २ टेबलस्पून
- दाण्याचे कूट - १ टेबलस्पून
- मीठ - स्वादानुसार
- साखर - १/२ टीस्पून
- आमचूर - १/२ टीस्पून
Instructions
- दोडक्याची भाजी करताना दोडाक्याची सालं व शिरा काढून घ्या.
- एका ताठलीत पसरून वाळायला ठेवा. साधारण एक ते दोन दिवसांत सालं पूर्ण वाळतील. ती हाताने कुस्करा व मोजून घ्या.
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, हळद, व ठेचलेल्या मिरच्या घाला.
- थोडेसे परतून त्यात तीळ घाला व गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या.
- खोबरे घालून तेही गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या.
- आता त्यावर दोडाक्याची वाळून कुस्करलेली सालं घालून सर्व मिसळून घ्या.
- त्यात मीठ, साखर, आमचूर व दाण्याचे कूट घालून सर्व मिसळून घ्या व एक दोन मिनिटे परता.
- मग गॅस बंद करून टाका.
- चटणी थोडी गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा म्हणजे ह्याचा कुरकुरीतपणा टिकून राहील.