
दोडक्याची भाजी रेसिपी
दोडका ही एक उत्तम प्रकारची पौष्टिक भाजी आहे जी मी महाराष्ट्रीयन पद्धतीने हरभऱ्याची डाळ व गोडा मसाला वापरून बनविते. ह्या भाजीची खासियत म्हणजे दोडक्याच्या शिरा टाकून ना देता त्या वाळवून त्यांचीही एक चविष्ट कोरडी चटणी बनविता येते. इथे मी भाजीची रेसिपी दिली आहे. दोडक्याच्या शिरांची चटणी साठी पुढील लिंक वर क्लिक करा -
https://goo.gl/anx9ty
Ingredients
- दोडका - दोन मध्यम आकाराचे
- हरभऱ्याची डाळ - ४ टेबलस्पून
- तेल - ३ टीस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/२ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - चवीप्रमाणे
- काळा / गोडा मसाला - १ टीस्पून
- गूळ - २ टीस्पून
Instructions
- हरभऱ्याची डाळ निदान अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा.
- दोडक्याच्या शिरा व सालं काढून एका बशीत पसरून चटणीसाठी वाळवायला ठेवा.
- दोडका उभा चिरून आतील मोठ्या व घट्ट बिया काढून घ्या. बिया कोळ्या असल्यास काढायची गरज नाही. बिया काढून दोडक्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला .
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग, हळद व पाणी काढून टाकून हरभऱ्याची डाळ घाला.
- थोडे हालवून त्यात चिरलेला दोडका घाला व मिसळून घ्या.
- त्यात मीठ, तिखट, काळा मसाला व गूळ घाला.
- परत एकदा सर्व मिसळून त्यात अगदी थोडे (अंदाजे २ टेबलस्पून) पाणी घाला व झाकण ठेऊन दोडका मऊसर शिजवून घ्या.
- दोडका शिजल्यावर गॅस बंद करून टाका व ही दोडाक्याची चविष्ट भाजी पोळीबरोबर वाढा. (आवडत असल्यास वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायला हरकत नाही.)