बटाट्याची चकली रेसिपी
बटाट्याची चकली हा एक चविष्ट उपासाला चालणारा पदार्थ आहे. ही चकली इतकी झटपट होते की तुम्हाला कधीही ताजी बनवून चहाबरोबर खायला घेता येईल. ह्यासाठी लागणारी उपासाची भाजणी बाजारातून विकत आणता येईल किंवा घरी ही बनविता येईल. उपासाच्या भाजणीची रेसिपी मी ‘उपासाचे थालीपीठ’ ह्या रेसिपीत दिली आहे. ती तुम्ही वरील दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करून पाहू शकता. जर उपासाची भाजणी उपलब्ध नसेल तर तुम्ही वऱ्याचे तांदूळ किंचित गुलाबी रंगावर भाजून घेऊन त्याचे मिक्सर मध्ये बारीक पीठ तयार करून ते ही वापरू शकता.
Ingredients
- बटाटे - २ मध्यम आकाराचे उकडून सालं काढलेले
- उपासाची भाजणी - ४ टेबलस्पून
- मीठ - स्वादानुसार
- लाल तिखट किंवा हिरव्या मिर्च्यांची पेस्ट - १/२ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
- जिरे - १/२ टीस्पून
- तेल - तळण्यासाठी
Instructions
- उकडलेले बटाटे हाताने, मॅशरने किंवा किसणीने किसून चांगले कुस्करून घ्या.
- त्यात उपासाची भाजणी मिसळा. (जर उपासाची भाजणी उपलब्ध नसेल तर वऱ्याचे तांदूळ किंचित गुलाबी दिसेपर्यंत भाजून घ्या व त्याचे मिक्सर मध्ये बारीक पीठ करून घ्या. व हे पीठ कुस्करलेल्या बटाट्यात मिसळा.)
- त्यात मीठ, तिखट (किंवा मिर्च्यांची पेस्ट), व जिरे घाला.
- सगळे मिसळून चांगले मळून घ्या.
- तयार पिठाचा थोडा भाग घेऊन त्याची हातांमध्ये फिरवून सुरळी करता येते का पहा. जर नसेल तर थोडा पाण्याचा हात लाऊन परत एकदा मळून घ्या. जोपर्यंत पिठाची सुरळी करता येत नाही तोपर्यंत पाण्याचा हात घेऊन मळत राहा. पिठाचा कणकेप्रमाणे गोळा झाला पाहिजे.
- तळण्यासाठी तेल तापत ठेवा.
- मळलेले थोडे पीठ घेऊन चकलीचा सोऱ्या भरून घ्या.
- एका ताठलीत ३-४ चकल्या पाडून घ्या.
- तेल गरम झाल्यावर ३-४ चकल्या तेलात टाकून त्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत बारीक-मध्यम आचेवर तळून घ्या.
- एक घाणा तळून होईपर्यंत दुसरा चकल्याचा घाणा पाडून तयार ठेवा. तळून झाल्यावर एका पेपर टॉवेलवर काढा. अश्याच सर्व पिठाच्या चकल्या बनवून घ्या.
- पूर्ण गार झाल्यावर कुरकुरीत बटाट्याच्या चकल्या एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.