गवसणी
गवसणी ही एक निराळ्या प्रकारची पोळी आहे. ह्यात तांदुळाच्या पिठाचे सारण व गव्हाच्या पिठाचे कवच असते. म्हणून ह्याचे नाव 'गवसणी'. गवसणी गरम गरम खायला फारच छान लागते पण आधीपासून करून ठेवल्यास जेवायच्या वेळी ही तुम्ही थोडीशी मायक्रोवेव मध्ये गरम करून घेतलीत तरी ही मऊ आणि छान लागते. गवसणी कोणत्याही भाजीबरोबर वाढायला हरकत नाही.
Ingredients
- कवचासाठी :
- गव्हाचे पीठ (कणीक) - १/२ कप + लाटताना वरून लावायला
- तेल - १/२ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- सारणासाठी :
- तांदुळाची पिठी - ३/४ कप
- तेल - १/२ टीस्पून
- मीठ - १/२ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
Instructions
कवचासाठी :
- गव्हाच्या पिठात तेल व मीठ घालून घडीच्या पोळ्यांच्या कणकेप्रमाणे मऊसर कणीक भिजवून घ्या.
- १०-१५ मिनिटे तशीच झाकून ठेवा.
सारणासाठी :
- पाऊण कप पाणी एका कढईत गरम करून त्यात मीठ व तेल घाला.
- पाण्याला उकळी येऊ द्या व मग गॅस बारीक करा.
- त्यात एका हाताने हालवत दुसऱ्या हाताने हळूहळू तांदुळाची पिठी घाला.
- सर्व मिसळल्यावर झाकण ठेऊन ५-७ मिनिटे बारीक गॅसवरच शिजू द्या. मधे मधे एक दोनदा हलवायला विसरू नका.
- गॅस बंद करून थोडे गार होऊ द्या.
- हाताने मळण्यासारखे गार झाल्यावर हाताला थोडे तेल लावा व परत एकदा मळून एक सारखे करून घ्या.
पुढील कृति :
- कवचासाठी तयार केलेल्या कणकेचे अंदाजे दीड ते दोन इंच मोठे एकसारखे भाग करून घ्या.
- तितकेच भाग सारणाचेही करून घ्या. सारणाचे भाग कवचाच्या भागांपेक्षा आकाराने जवळजवळ दुप्पट होतील.
- कवचाचा एक भाग घेऊन हातांमध्ये फिरवून गोल व चपटा करून घ्या.
- आता त्याचा उंडा करून त्यात सारणाचा एक भाग ठेऊन तोंड बंद करून घ्या.
- परत एकदा चपटा करून घ्या व दोन्ही बाजूंना थोडी थोडी कणीक लाऊन घ्या.
- त्याची पातळ पोळी लाटून घ्या.
- गरम तव्यावर टाकून गवसणी दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. दोन्ही कडे छोटे छोटे डाग आल्यावर तव्यावरून काढून घ्या.
- गरम गरम गवसणी कोणत्याही भाजीबरोबर वाढा.