- Prep Time: 10 minutes
- Cook Time: 15 minutes
- Serving: ४ जणांसाठी
दूधभोपळ्याची भाजी (डाळ घातलेली)
दूधभोपळ्याची ही भाजी महाराष्ट्रीय काळा / गोडा मसाला वापरून बनविली आहे. हा मसाला बाजारात विकत ही मिळतो व घरी ही बनविता येतो. ह्या भाजीत गूळ घातल्यामुळे भाजीला किंचित गोडसर चव येते पण गुळाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी / जास्त करू शकता. ह्या भाजीत मी हरभऱ्याची डाळ घातली आहे. पण त्या ऐवजी तुम्ही मुगाची किंवा उडदाची डाळ ही वापरू शकता. मुगाची डाळ वापरल्यास ती हरभऱ्याच्या डाळीप्रमाणेच १/२ तास भिजत घाला पण उडदाची डाळ भिजवायची गरज नाही. ती तशीच फोडणीत घालून गुलाबी रंगाची होईपर्यंत परतून घ्या.
दूधभोपळ्याची एक निराळ्या चवीची आंबटगोड भाजी टोमॅटो घालून ही बनविता येते. त्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.
Ingredients
- दूधभोपळा - २ कप चौकोनी चिरलेला
- हरभऱ्याची डाळ - २ टेबलस्पून
- तेल - ३ टीस्पून
- मोहरी - १/४ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- काळा / गोडा मसाला - ३ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - चवीप्रमाणे
- गूळ - १ टेबलस्पून
- कोथिंबीर - बारीक चिरलेली, वरून सजावटीसाठी
Instructions
- दूधभोपळ्याची सालं काढून उभा व अर्धा कापून घ्या.
- आतील मोठ्या व जून बिया काढून टाका व चौकोनी फोडी करून घ्या.
- २ कप चिरलेल्या दूधभोपळ्यासाठी, २ टेबलस्पून हरभऱ्याची डाळ १/४ कप पाण्यात १/२ तास भिजत घाला.
- कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर हिंग व हळद घाला.
- मग भिजवलेली हरभऱ्याची डाळ व दूधभोपळ्याच्या फोडी ही घाला. सर्व एकदा मिसळून घ्या.
- आता काळा / गोडा मसाला, मीठ, लाल तिखट व गूळ घालून मिसळा.
- १/४ कप पाणी ही घाला व झाकण ठेऊन दूधभोपळा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
- दूधभोपळा शिजल्यावर गॅस बंद करा व वरून चिरलेली कोथिंबीर पसरून दूधभोळ्याची भाजी पोळी बरोबर वाढा.