- Serving: १६ समोस्यांसाठी
समोसा रेसिपी
उत्तर भारतातील चहाबरोबर खायचा सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे समोसा. गरम गरम समोसे गोड चटणी व हिरवी चटणी ह्यांच्या बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर खूपच चटपटीत, कुरकुरीत व खमंग लागतात. हे घरी बनवायला अगदी सोपे आहेत व तुम्हाला जर आधीपासून तयार करून ठेवायचे असले तर खाली कृतीमध्ये दिल्याप्रमाणे दोन स्टेप्स मध्ये तळून सर्व्ह करू शकता. समोस्यावर थोडे छोले, गोड चटणी, हिरवी चटणी, व थोडी शेव घालून 'समोसा-चाट' ही बऱ्याचदा सर्व्ह केला जातो.
Ingredients
- समोस्याच्या कव्हर साठी :
- मैदा - २ कप
- तेल - २ टेबलस्पून
- मीठ - १ टीस्पून
- ओवा - १/२ टीस्पून
- समोस्याच्या सारणासाठी :
- तेल - ३ टेबलस्पून
- जिरे - १ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- आल्याची पेस्ट किंवा किसलेले आले - २ टीस्पून
- हिरव्या मिरच्या (ठेचलेल्या) - १ टीस्पून
- धने - २ टीस्पून
- हिरवे मटार (ऐच्छिक) - १/२ कप
- गरम मसाला - १ & १/२ टीस्पून
- बटाटे - ५ कप उकडलेले बटाटे हातानी मोडलेले
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - १/२ टीस्पून
- आमचूर - १ टीस्पून
- कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरलेला
Instructions
कव्हर साठी:
- एका तसराळ्यात मैदा घेऊन त्यावर २ टेबलस्पून तेल गरम करून घाला.
- त्यात मीठ व ओवा घालून पाण्याने पुऱ्यांप्रमाणे घट्ट भिजवून घ्या.
- झाकून १५ मिनिटे बाजूला ठेऊन द्या.
सारणासाठी :
- एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्या.
- त्यात हिंग, जिरे, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरच्या, व धने घाला.
- धने ब्राऊन दिसेपर्यंत परतून घ्या.
- आता गरम मसाला घालून ५-७ सेकंद परतून घ्या.
- मटार वापरात असल्यास तेही घाला व थोडे परतून घ्या. मटार वापरात नसल्यास हाताने फोडलेले बटाटे घाला.
- चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, व आमचूर घालून सर्व मिसळून घ्या. मग त्यात कोथिंबीर ही मिसळा.
- तयार सारण गार होण्यासाठी ठेवा.
पुढील कृति :
- कव्हर साठी भिजविलेल्या मैद्याचे एकसारखे ८ भाग करून घ्या.
- तसेच सारणाचे एकसारखे १६ भाग करून घ्या.
- कव्हरचा एक भाग घेऊन त्याची गोल पुरी लाटून घ्या.
- ही पुरी मधून सुरीने कापून त्याचे दोन अर्धगोलाकार भाग करून घ्या.
- त्यातील एक अर्धा गोल घेऊन, व्हिडिओत व खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे, त्याचा दुमडून कोन तयार करून घ्या.
- कोनची उघडी बाजू वर करून त्यात सारणाचा एक भाग दाबून भरा.
- आता वरून तोंड बंद करून टाका व बंद केलेली कड थोडी आणखीन ओढून व लांबवून घ्या म्हणजे समोसा उभा राहील व त्याला आकर्षक आकार येईल.
- आता दुसऱ्या अर्ध्या गोलाचा ही तसाच कोन करून, त्यात सारण भरून समोसा तयार करून घ्या. तसेच कव्हरच्या सर्व भागांचे व सारणाचे समोसे बनवून घ्या.
- सर्व समोसे गरम तेलात बारीक ते मध्यम आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
- जास्तीचे तेल निथळून समोसे पेपर टॉवेलवर काढून घ्या.
- गरम गरम सामोसे गोड व हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर लगेच सर्व्ह करा.