- Serving: १५-२० लाडवांसाठी
रव्याचे लाडू रेसिपी
बाहेरून किंचित कोरडे व आतून मऊ असलेले रवा-नारळाचे हे लाडू घरी बनवायला अगदी सोपे आहेत. ह्यासाठी तुम्ही बारीक किंवा जाड कोणता ही रवा वापरू शकता. मी इथे जाड रवा वापरला आहे. पण जर तुम्ही बारीक रवा वापरणार असाल तर साखरेचा पाक करताना पाक एक तारी पाकापेक्षा किंचित पुढे जाऊ द्या. कारण बारीक रव्यात पाक जास्त शोषला जात नाही.
रूम टेम्परेचर वर ठेवल्यास हे लाडू १०-१५ दिवस चांगले राहतील पण फ्रीज मध्ये ठेवल्यास महिनाभर सुद्धा छान टिकतील. मात्र फ्रीज मध्ये ठेवल्यास खायला देताना निदान अर्धा तास तरी लाडू बाहेर काढून ठेवा.
Ingredients
- तूप - ३/४ कप
- रवा - २ कप
- ताजं खवलेलं खोबरं - १ कप
- साखर - १ & ३/४ कप
- वेलदोड्याची पूड - आवडीप्रमाणे
- बेदाणे - अंदाजे २०
Instructions
- एका कढईत तूप व रवा एकत्र करून घ्या.
- मध्यम आचेवर सतत हालवत रवा गुलाबी दिसेपर्यंत भाजून घ्या.
- खवलेलं ताजं खोबरं घाला व परत ३-४ मिनिटे भाजून घ्या.
- रवा व खोबरं कढईतून काढून घ्या व त्याच कढईत साखर घाला.
- साखरेच्या अर्धे पाणी साखरेवर घालून सतत हालवत उकळी येऊ द्या.
- थोड्या वेळाने पाक दोन बोटांमध्ये घेऊन ताणून पहा. एक तार यायला लागल्यावर गॅस बंद करा.
- पाकात भाजून ठेवलेला रवा मिसळा व गार व्हायला ठेऊन द्या. दर अर्ध्या तासाने हे मिश्रण वर-खाली करा.
- साधारण २-३ तासांनी हे मिश्रण लाडू वळण्यासारखे होईल.
- मिश्रणात वेलदोड्याची पूड घाला व हाताने गुठळ्या मोडत मिश्रण परत एकदा चांगले मिसळून घ्या.
- मग हातांनी गोल गोल लाडू वळा.
- लाडू वळताना प्रत्येक लाडवात बाहेरून दिसेल असा एक बेदाणा टोचा.
- फ्रीज मध्ये ठेवल्यास हे लाडू महिनाभर सुद्धा चांगले राहतील. मात्र तसे केल्यास खायला देताना निदान अर्धा तास तरी लाडू फ्रीज मधून बाहेर काढून ठेवायला लागतील.
काही आवश्यक सूचना व टिप्स -
१. जर तुम्ही बारीक रवा वापरत असाल तर एकतारी पाक एखादा मिनीट तसाच आणखीन उकळू द्या व मग त्यात रवा मिसळा.
२. लाडवाचे मिश्रण बरेच तासांनी सुद्धा जर कोरडे होत नसेल तर त्यात पाव कप कोरडा भाजलेला रवा घालून सर्व मिसळा. आता परत हे मिश्रण कोरडे व्हायला ठेऊन द्या. २-३ तासांनी हाताने चांगले मळून मग लाडू वळता येतील.
३. जर लाडवाचे मिश्रण जास्त कोरडे झाले व लाडू वळता येत नसतील तर मिश्रणामध्ये एक ते दोन टीस्पून गरम पाणी हळू हळू घालत मिश्रण परत मळून घ्या. लगेच लाडू वळता येतील.
खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद