
- Yield: एक डीड इंच मोठे साधारण १५-२० चिक्क्या
- Prep Time: ५ minutes
- Cook Time: १० minutes
दाण्याची कुरकुरीत चिक्की रेसिपी
गूळ व दाण्याची ही कुरकुरीत चिक्की थंडीच्या दिवसांत खायला खूपच चविष्ट आणि पौष्टिक असे स्नॅक् आहे. बनवायला ही अगदी सोपी आहे व काही मिनिटातच तयार करता येते. ह्यासाठी तुम्हाला फक्त दोन मुख्य गोष्टी तयार ठेवाव्या लागतील - भाजून सालं काढलेले दाणे व बारीक फोडलेला गूळ. दाणे भाजण्याची कृति पुढे दिल्याप्रमाणे आहे - कच्चे दाणे एका कढईत घालून मंद आचेवर, सतत हालवत भाजावेत. दाण्यांवर काळपट डाग आले कि गॅस बंद करावा व दाणे पूर्ण गार होऊ द्यावेत. गार झाल्यावर हाताने चुरडून त्यांची सालं काढून घ्यावीत व पाखडून किंवा फुंकर मारून सुटी झालेली सालं काढून टाकावीत. आता हे भाजले दाणे खमंग कुरकुरीत चिक्की साठी वापरावेत.
Ingredients
- भाजून सालं काढलेले दाणे - १ कप
- बारीक फोडलेला गूळ - २/३ कप दाबून भरलेला
- तूप - अगदी थोडेसे हाताला लावण्यासाठी
Instructions
- एका पोळपाटाला पार्चमेंट पेपर लावून तयार ठेवा. तसेच एका छोट्या वाटीत थोडेसे पाणी घालून तयार ठेवा. (दाणे भाजलेले नसतील तर वर summary मध्ये दिल्याप्रमाणे दाणे भाजून सालं काढून घ्या.)
- गूळ एका कढईत काढून घ्या.
- गॅस प्रथम मध्यम आचेवर ठेऊन गूळ विरघळेपर्यंत सतत हालवत रहा.
- एकदा गूळ विरघळायला सुरवात झाली की मग गॅस जरा बारीक करा. पण सतत हालवत रहा म्हणजे गूळ एकसारखा विरघळेल.
- थोड्याच वेळात गुळाला फेस व्हायला सुरवात होईल. सतत हालवत आणखीन २ मिनिटे तसेच शिजवत ठेवा.
- आता पाकाचा एक थेंब जवळ ठेवलेल्या वाटीतल्या पाण्यात टाकून पहा. पाण्यात टाकताच तो कडक व्हायला हवा.
- कडक झालेला थेंब बाहेर काढून बोटांनी मोडून पहा. हा कुरकुरीत असायला हवा. जर अजून पर्यंत चिवट असेल तर पाक अजून शिजवावा.
- दर एकेका मिनिटाने पाक पाण्यात टाकून वर सांगितल्याप्रमाणे तपासून पहा.
- पाण्यात टाकल्यावर त्याची टणक व कुरकुरीत गोळी झाल्यावर गॅस बंद करून टाका.
- आता भाजलेले दाणे गुळाच्या तयार पाकात घालून सर्व नीट पण पटकन मिसळून घ्या व लगेचच सर्व मिश्रण पार्चमेंट पेपर लावलेल्या पोळपाटावर घाला.
- हाताला थोडेसे तूप लावून, सर्व मिश्रण गार व कठीण व्हायच्या आत, हाताने दाबून चपटे व चौकोनी थापा.
- आता त्याचे एक ते दीड इंच मोठे चौकोनी काप करून घ्या व पूर्ण पणे गार होऊ द्या.
- हे मिश्रण कापताना अजून थोडे चिकट वाटेल पण गार झाल्यावर छान कुरकुरीत होईल व हाताने मोडून सर्व काप वेगळे करता येतील. पूर्ण गार झाल्यावर सर्व चौकोन वेगवेगळे करून घ्या.
- खमंग कुरकुरीत दाण्याची ही चिक्की पूर्ण गार झाल्यावर एका हवा-बंद डब्यात भरून ठेवा.