- Serving: २०-२५ लाडवांसाठी
तिळगुळाचे कडक लाडू रेसिपी
संक्रांतीला तिळगुळाचे अनेक प्रकार बनविले जातात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे तिळगुळाचे कडक लाडू. हे लाडू कडक जरी असले तरी खायला अतिशय खमंग व कुरकुरीत लागतात. शिवाय पटकन बनविता येतात. मात्र गरम असतानाच हे लाडू पटापट वळावे लागतात नाहीतर गार झाले तर वळता येत नाहीत. ह्या कारणासाठी एका वेळेला भराभर वळता येतील इतक्याच लाडवांचे प्रमाण एकावेळी घ्यावे.
Ingredients
- तीळ - १ कप
- गूळ - ३/४ (पाऊण) कप
- शेंगदाणे - १/४ कप
- किसलेले सुके खोबरे - १/४ कप
- तूप - १ टेबलस्पून व आणखीन थोडेसे, वळताना हाताला लावायला
- वेलदोड्याची पूड (ऐच्छिक) - आवडीप्रमाणे १/४-१/२ टीस्पून
Instructions
- एका कढईत तीळ खमंग भाजून घ्यावेत. एकसारखे गुलाबी दिसायला लागल्यावर कढईतून काढून घ्यावेत.
- शेंगदाणे ही बाहेरून काळपट डाग दिसेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावेत व बाजूला काढावेत.
- किसलेले खोबरे ही गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून, बाजूला काढून घ्यावे.
- त्याच कढईत गूळ घालून, गॅस बारीक ठेऊन, गूळ विरघळू द्यावा.
- एकदा सगळा गूळ विरघळला की गॅस जरा मोठा करावा. एखाद्या मिनिटात गुळाला कडेने फेस सुटायला लागेल.
- गूळ तसाच पुढे २ मिनिटे उकळत ठेवावा.
- मग गुळाचा एक थेंब थोड्या पाण्यात घालून त्याची कुरकुरीत गोळी होते का हे तपासून पाहावे. पाण्यात टाकल्यावर गोळी चिवट नसून कुरकुरीत व्हायला हवी. बोटाने तुकडा मोडता यायला हवा.
- तसे झाल्यावर गॅस बंद करून टाकावा व त्यात तीळ, दाणे, खोबरे, व तूप घालून सर्व मिसळावे. आवडत असल्यास थोडी वेलदोड्याची पूड घालावी.
- व कढई खाली उतरवून, हाताला थोडेसे तूप लाऊन, हे मिश्रण गरम असतानाच छोटे छोटे लाडू वळावेत.