पिठलं रेसिपी
पिठलं, कांदा, लसणाची चटणी आणि भाकरी हा तर महाराष्ट्रीयन जेवणातला खास बेत - झटपट तयार होणारा, गरम गरम व आवडीचा! शिवाय भाकरी ऐवजी हे पातळ पिठलं पोळी किंवा भाता बरोबर ही खाता येतं. तसंच वरील विडिओ मध्ये मी कांद्याचं पिठलं कसा बनवायचं ते दाखवलंय पण कांद्याच्या ऐवजी तुम्ही लसूण घातला तरी सुद्धा पिठलं खूप छान लागतं.
Ingredients
- तेल - ४ टीस्पून
- मोहरी - १ टीस्पून
- जिरे - १ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ - १/२ टीस्पून
- कांदा किंवा लसूण - १ कांदा चिरलेला किंवा १ टेबलस्पून लसूण बारीक चिरलेला
- हिरव्या मिरच्या - २ किंवा चवीनुसार
- मीठ - चवीनुसार
- डाळीचं पीठ (बेसन) - अंदाजे १ कप
- कोथिंबीर (बारीक चिरलेली) (ऐच्छिक) - वरून पसरायला
Instructions
- एका पातेल्यात तेल गरम करून घ्या.
- त्यात मोहरी घाला व ती तडतडल्यावर त्यात जिरे, हिंग व हळद घाला.
- मग मिरच्या व कांदा किंवा लसूण घाला.
- कांदा / लसूण २-३ मिनिटे परतून घ्या व त्यावर ४ कप पाणी घाला.
- पाण्यात चवीप्रमाणे मीठ घाला व पाण्याला अधण येऊ द्या.
- आता गॅस जरा बारीक करा. एका हाताने पाणी ढवळा व दुसऱ्या हाताने थोडं थोडं बेसन घालत पिठलं हवं तेवढं दाटसर करून घ्या. साधारण २ कप पाण्याला १/२ कप बेसन लागेल. तुम्हाला जर घट्टसर पिठलं हवं असेल तर बेसन थोडं आणखीन घाला. पातळसर ठेवायचं असेल तर बेसन कमी घाला.
- गॅस अगदी बारीक ठेऊन २-३ मिनिटे पिठलं चांगलं शिजू द्या व मग गॅस बंद करा.
- आवडत असेल तर वरून कोथिंबीर घाला व गरम गरम पिठलं भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर वाढा.