- Prep Time: 20 minutes
- Cook Time: 30 minutes
- Serving: मध्यम आकारचे २५-३० वडे
साबुदाणा वडा रेसिपी
उपासाला चालेल असा एक खमंग वडा म्हणजे साबुदाणा वडा. बाहेरून कुरकुरीत व आतून मऊसर असलेला हा वडा अतिशय चविष्ट लागतो. उपासाच्या दिवशी हा वडा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा नारळ-कोथिंबिरीच्या चटणीबरोबर खाऊ शकता पण एरवी कधीही चहा नाष्ट्याच्या वेळी हा केचप बरोबर खायला ही छान लागतो.
Ingredients
- साबुदाणा - १ & १/२ कप
- वऱ्याचे तांदूळ - ३ टेबलस्पून
- उकडलेले बटाटे - २
- दाण्याचे कूट - १ & १/२ कप
- हिरव्या मिरच्या - ४-५ वाटलेल्या किंवा बारीक चिरलेल्या
- मीठ - चवीप्रमाणे
- साखर - २ टीस्पून
- तेल - वडे तळण्यासाठी
Instructions
- ३-४ तासांसाठी साबुदाणा पाण्यात भिजवून ठेवा. भिजवायच्या आधी १-२ वेळा पाण्याने धुऊन घ्या व व नंतर साबुदाण्याच्या थोडेसे वरपर्यंत पाणी राहील एवढे पाणी घालून साबुदाणा भिजवून ठेवा.
- वऱ्याचा तांदुळात १/२ कप पाणी घालून उकळायला ठेवा.
- साधारण ५ मिनिटांनी पाणी अटून तांदुळापर्यंत आले की गॅस बारीक करा व झाकण ठेवून शिजवून घ्या.
- अंदाजे ५ मिनिटांनी अगदी बारीक गॅसवर पाणी सगळे संपेल व तांदूळ पूर्ण शिजतील. तसे झाल्यावर गॅस बंद करून टाका.
- ३-४ तासांनी साबुदाणा चांगला भिजून फुलून येईल.
- त्यात शिजविलेले वऱ्याचे तांदूळ घाला.
- उकडलेले बटाटे ही कुस्करून घाला. तसेच मिरच्या, मीठ, साखर व दाण्याचे कूट घालून मिसळून घ्या.
- थोडे थोडे पाणी घालत हाताने चांगले मळून घेत मऊसर गोळा तयार करून घ्या.
- आता ह्या पिठाचे हाताने गोल गोल वडे तयार करून घ्या. मी हे वडे मेदू वेड्यासारखे मध्ये भोक पाडून बनविले आहेत पण तुम्हाला आवडत असतील तर हे नुसते लाडवाप्रमाणे गोल ही करू शकता. मात्र तसे केल्यास लहान आकाराचे वडे बनवावेत म्हणजे तळताना आतपर्यंत शिजतील.
- आता एका कढईत तेल गरम करून सगळे वडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
- गरम गरम साबुदाणा वडे एखाद्या चटणीबरोबर किंवा केचप बरोबर वाढा.