वडा पाव रेसिपी (झणझणीत वडा पाव स्पेशल चटणी बरोबर)
मुंबई पुण्याकडील भागात मिळणारा एक खमंग चटपटीत पदार्थ म्हणजे वडा पाव. हा पदार्थ घरी ही तितकाच चविष्ट बनवायला अगदी सोपा आहे. ह्यासाठी लागणारी विशेष प्रकारची झणझणीत लाल चटणीची रेसिपी ही मी इथे सांगितली आहे. आशा करते तुम्हाला आवडेल.
Ingredients
- वड्याच्या सारणासाठी -
- उकडून सालं काढलेले बटाटे - ५ मोठे
- आल्याची पेस्ट - १ टेबलस्पून
- लसणाची पेस्ट - १ टेबलस्पून
- ठेचलेल्या हिरव्या मिरच्या - ३-४ किंवा चवीप्रमाणे
- कांदा - १ बारीक चिरलेला
- मीठ - चवीप्रमाणे
- वड्याच्या कव्हर साठी -
- डाळीचं पीठ / बेसन - १ & १/२ कप
- खायचा सोडा किंवा सोडियम बायकार्बनेट - १/४ टीस्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- तिखट लाल चटणीसाठी -
- बेसनाच्या कुरकुरीत गाठी - १/२ कप
- लसूण - २ मोठ्या पाकळ्या
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - १ & १/२ टीस्पून किंवा चवीप्रमाणे
- तेल - तळण्यासाठी
- वडा पाव साठी -
- पाव - १०-१२ किंवा आवश्यकतेनुसार
- चिंचेची गोड चटणी - आवश्यकतेनुसार
- वर बनविलेली तिखट चटणी - आवश्यकतेनुसार
- बटाटा वडा - प्रत्येक पावासाठी एक
Instructions
बटाटा वड्याच्या सारणासाठी -
- उकडलेले बटाटे हातानेच फोडून तुकडे करून घ्या.
- त्यात आल्याची व लसणाची पेस्ट घाला, हिरव्या मिरच्या व मीठ ही घाला व सगळं छान मिसळून घ्या.
- ह्या सारणाचे साधारण एक ते दीड इंच मोठे गोळे तयार करून घ्या.
वड्याच्या कव्हर साठी -
- डाळीच्या पिठात सोडा, व मीठ घालून हळू हळू पाणी घालत पीठ भिजवून घ्या.
- हाताने पीठाचे गोळे मोडत मोडत थोडेसे घट्टसर असे पीठ भिजवून घ्या. साधारण भाज्यांच्या पिठाप्रमाणे हे पीठ थोडे दाटसर असायला हवे. (इथे मी १ & १/२ कप बेसनासाठी अंदाजे १ कप पाणी वापरले.)
वडे तळण्यासाठी-
- कढई मध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घ्या.
- सारणाचा एक गोळा घेऊन सगळी कडून पीठ लागेल असा पिठात बुडवून घ्या व लगेच गरम तेलात सोडा.
- कढईत मावतील इतके वडे एका वेळी घालून सगळे वडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
- गॅस मध्यम आचेवर ठेऊन सतत हालवत वडे तळून घ्या व नंतर एका पेपर टॉवेल वर काढा.
लाल तिखट चटणीसाठी -
- सगळे वडे तळून झाल्यावर उरलेल्या पिठाचे छोटे छोटे थेंब हातानेच गरम तेलात सोडा व सतत हालवत सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या व छोटी छोटी पण कुरकुरीत अशी भजी तयार करून घ्या.
- एका मिक्सर मधे लसूण व लाल तिखट घालून एकदा फिरवून घ्या म्हणजे लसूण वाटला जाईल.
- आता त्याच मिक्सर मधे वर तळलेली छोटी छोटी भजी व थोडेसे मीठ (भाज्यातही थोडे मीठ आहे हे लक्षात असू द्या व त्या अंदाजानेच थोडेसे मीठ घाला) घालून सर्व भरडसर वाटून वडा पाव ची स्पेशल तिखट चटणी तयार करून घ्या.
वडा पाव साठी -
- एकावेळी एक पाव घेऊन तो मधोमध आडवा कापून त्याचे दोन भाग करून घ्या.
- आतील दोन्ही बाजूंना थोडी थोडी गोड चटणी लावून त्यावर तिखट चटणी ही पसरून घ्या.
- पावच्या एका भागावर एक वडा ठेऊन दुसऱ्या अर्ध्या पावाने झाका.
- तयार वडापाव तव्यावर नुसताच किंवा दोन्ही बाजूंस थोडे थोडे लोणी लाऊन गरम करून घ्या व लगेच खायला द्या.