वऱ्याचे तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी रेसिपी
उपासाच्या दिवशी फारशी पूर्व तयारी न करता, झटपट तयार करता येणारा फराळाचा पदार्थ म्हणजे वऱ्याचे तांदूळ व त्याबरोबर शेंगदाण्याची गरम गरम आमटी. ह्यासाठी लागणारे दाण्याचे कूट हे आपल्या महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात तयार असतेच, त्यामुळे ही रेसिपी अगदी झटपट तयार करता येते. ह्या तांदूळ-आमटी बरोबर उपासाचे लिंबाचे गोड लोणचे, बटाट्याची उपासाची भाजी, व उपासाचे पापड ही वाढल्यास आणखीन छान लागेल.
Ingredients
- वऱ्याचे तांदूळ - १/२ कप
- दाण्याचे कूट - १/४ कप
- तेल किंवा तूप - २ टीस्पून
- जिरे - १/२ टीस्पून
- आमसुलं - ३-४
- मीठ - चवीप्रमाणे
- लाल तिखट - चवीप्रमाणे
Instructions
तांदुळासाठी :
- वऱ्याचे तांदूळ पाण्याने धुऊन घ्या व सगळे पाणी काढून टाका.
- त्यावर १ कप पाणी ( तांदूळ मऊ हवे असल्यास १ & १/२ कप पाणी घाला) आणखीन घालून गॅस वर शिजायला ठेवा.
- उकळी आल्यावर तसेच उकळत ठेवा व पाणी तांदुळापर्यंत आले कि गॅस बारीक करून झाकण ठेवा व शिजू द्या.
- मधे मधे एक दोनदा हलवा व सगळे पाणी संपले की गॅस बंद करा.
दाण्याच्या आमटीसाठी :
- दाण्याच्या कुटात अंदाजे १/४-१/२ कप पाणी घालून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
- पातेल्यात तेल/तूप गरम करून त्यात जिरे घाला व त्यावरच १ & १/४ कप पाणी घाला.
- त्यात आमसुलं, मीठ व तिखट घाला व तसेच दाण्याच्या कुटाची वाटून घेतलेली पेस्ट ही घाला.
- आमटीला उकळी आल्यावर मधे मधे हालवत, तसेच ३-४ मिनिटे आणखीन उकळू द्या.
- मग गॅस बंद करा.
वाढताना :
गरम गरम वऱ्याचे तांदूळ, शेंगदाण्याच्या गरम आमटी बरोबर वाढा. आवडत असल्यास सोबत लिंबाचे उपासाचे गोड लोणचे व बटाट्याची उपासाची भाजी ही त्याबरोबर वाढा.