- Serving: ४ जणांसाठी
बटाटा आणि फ्लॉवर ची मसालेदार भाजी रेसिपी
ह्या आधी फ्लॉवर आणि बटाट्याच्या अगदी साध्या भाजीची रेसिपी शेअर केली होती. पण इथे दिलेली भाजी जरा झणझणीत व मसालेदार आहे. नॉर्थ इंडियन रेस्टॉरंट्स मधे शक्यतो अश्या प्रकारची भाजी मिळते. पण तीच भाजी घरी बनविता आली तर त्यात वापरलेले तेलाचे प्रमाण तसेच तिखटाचं प्रमाण ही तुम्ही आपल्या आवडीनुसार ठेऊ शकता. आशा करते तुम्हाला रेसिपी आवडेल.
Ingredients
- फ्लॉवर चे मोठे मोठे तुरे - ३ कप
- बटाटे - २, मोठे मोठे व चौकोनी चिरलेले
- तेल - २ टेबलस्पून
- जिरे - १ टीस्पून
- कसुरी मेथी (वाळलेली मेथीची पानं) (ऐच्छिक) - २ टीस्पून
- कांदा - १ छोटा, चिरलेला
- लसूण - ४ मोठ्या मोठ्या पाकळ्या
- आलं - १ इंच मोठा तुकडा
- गरम मसाला - २ टीस्पून
- टोमॅटो - २ चिरलेले
- हळद - १/२ टीस्पून
- मीठ - चवीनुसार
- लाल तिखट - चवीनुसार
Instructions
- कांदा, आलं व लसूण एकत्र करून त्याची मिक्सर मधे पेस्ट करून घ्या.
- टोमॅटो ची ही मिक्सर मध्ये प्यूरी करून घ्या.
- एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला.
- त्यातच कसूरी मेथी व आलं, लसूण, कांदा ह्याची पेस्ट (कृतिक्रमांक १ मधील) ही घाला.
- त्यातच गरम मसाला ही घाला व ग्रेव्ही गडद होईपर्यंत चांगले परतून घ्या.
- आता त्यात टोमॅटोची प्यूरी (कृतिक्रमांक २ मधील), हळद व लाल तिखट ही घाला व परत थोडे परतून घ्या.
- आता त्यात फ्लॉवर व बटाट्याच्या फोडी घालून सर्व मिसळून घ्या.
- त्यावर मीठ ही घालून, हालवून घ्या व मग झाकण ठेऊन दोन्ही भाज्या शिजवून घ्या. मधे मधे हालवायला विसरू नका.
- दोन्ही भाज्या व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा. भाज्या शिजवून खूप जास्त मऊ होऊ देऊ नका. त्या करकरीत नसल्या पाहिजेत पण खूप मऊ होऊन मोडल्याही नाही पाहिजेत.
- आता ही चविष्ट भाजी पोळी किंवा फुलक्याबरोबर वाढा.