- Serving: ५ जणांसाठी
कट मिसळ पाव रेसिपी
मिसळ पाव हे महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. स्ट्रीट फूड जरी असले तरी योग्य रीतीने व स्वच्छता बाळगून बनविले तर हे खायला पौष्टिक सुद्धा आहे. मटकीमध्ये प्रोटीन्स असतातच पण मोड आलेली मटकी तर अतिशय पौष्टिक! मिसळ म्हणजे कांदा, टोमॅटो, व चटण्या इत्यादी घालून बनविलेली, मोड आलेल्या मटकीची उसळ. खरं तर मटकीची ही उसळ रोजच्या जेवणात पोळीबरोबर ही खायला अतिशय पौष्टिक आहे. तुम्हाला जर झणझणीत पदार्थ खायला आवडत असतील तर मिसळीवर 'कट' घालून बघा. 'कट' म्हणजे कांदा-लसणाचा वास असलेला झणझणीत काढा! आणि ही अशी मिसळ पावाबरोबर वाढली की झाला 'मिसळ-पाव'. तर खाली दिलेल्या रेसिपीत आपण मटकीला मोड कसे आणायचे, मटकीची उसळ व मिसळ कशी बनवायची व तिखट कट कसा बनवायचा हे सर्व पाहणार आहोत.
Ingredients
- मटकीला मोड आणण्यासाठी (अंदाजे ४ & १/२ कप मोड आलेल्या मटकी साठी -
- मटकी - १ & ३/४ कप
- मटकीच्या उसळीसाठी -
- मोड आलेली मटकी - ४ & १/२ कप
- शेंगदाणे - २ टेबलस्पून
- तेल - १ & १/४ टेबलस्पून
- मोहरी - १/२ टीस्पून
- हिंग - १/४ टीस्पून
- हळद - १/४ टीस्पून
- लसणाच्या पाकळ्या - ४ मोठ्या मोठ्या, बारीक ठेचलेल्या
- हिरव्या मिरच्या (ठेचलेल्या) किंवा लाल तिखट - २-३ मिरच्या किंवा चवीप्रमाणे
- मीठ - चवीप्रमाणे
- काळा / गोडा मसाला - २ टीस्पून
- गूळ - १ टेबलस्पून
- जिऱ्याची पूड - ३/४ टीस्पून
- बारीक चिरलेली कोथिंबीर - वरून पसरण्यासाठी; आवडीप्रमाणे
- मिसळ पाव साठी -
- पाव - आवश्यकतेनुसार
- लोणी (ऐच्छिक) - आवडीप्रमाणे
- मटकीची उसळ - आवश्यकतेनुसार
- बारीक चिरलेला कांदा - आवडीप्रमाणे; वरून पसरायला
- बारीक चिरलेला टोमॅटो - आवडीप्रमाणे; वरून पसरायला
- भेळेची आंबट-गोड चटणी - आवडीप्रमाणे; वरून पसरायला
- कोथिंबीर किंवा पुदिन्याची चटणी - आवडीप्रमाणे; वरून पसरायला
- पोह्यांचा चिवडा किंवा फरसाण - आवडीप्रमाणे
- बारीक शेव - आवडीप्रमाणे; वरून पसरायला
- कट बनविण्यासाठी -
- तेल - २ & १/२ टीस्पून
- मोठा मोठा चिरलेला कांदा - २ टेबलस्पून
- लसणाच्या पाकळ्या - २ मोठ्या
- काळा / गोडा मसाला - १ & १/२ टीस्पून
- लाल तिखट - १ & १/२ टीस्पून (झणझणीत कटासाठी) किंवा आवडीप्रमाणे
- टोमॅटोची प्युरी किंवा चिंचेचा दाट कोळ - १/२ टेबलस्पून टोमॅटो प्यूरी किंवा १/२ टीस्पून दाट चिंचेचा कोळ
- मीठ - चवीप्रमाणे
Instructions
मटकीला मोड आणण्यासाठी - (१ & ३/४ कप मटकीला मोड आणल्यावर त्याची ४ & १/२ कप मोड आणलेली मटकी तयार होईल)
- मटकी पाण्याने एक दोनदा धुऊन आठ ते दहा तास भरपूर पाण्यात भिजवून ठेवा.
- मग एका रोळीत ५ मिनिटे ओतून ठेवा म्हणजे सर्व पाणी वाहून जाईल.
- आता अर्धा पाऊण तास एका टॉवेलवर पसरून ठेवा; मधे मधे एक दोनदा हलवून ठेवा म्हणजे सगळी मटकी वरून पूर्णपणे कोरडी होईल.
- आता त्याच टॉवेल मधे घट्ट गुंडाळून रोळीत ठेवा व उन्हात किंवा एखाद्या उबदार जागेवर २४ तासांसाठी ठेऊन द्या.
- २४ तासांनी मटकीला छान मोड येतील. थंडीत कदाचित मोड यायला थोडा वेळ लागतो, तेंव्हा २४ तासांनी मटकी पाण्याने धुऊन घ्या व पसरून कोरडी झाल्यावर परत ६-८ तासांसाठी गुंडाळून ठेवा.
- मोड आलेल्या मटकीला पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. ही मटकी तुम्ही लगेच उसळ बनवायला वापरू शकता किंवा पसरून कोरडी झाल्यावर फ्रीज मधे १-२ दिवसांनंतर ही वापरू शकता.
मटकीच्या उसळीसाठी -
- मोड आलेल्या मटकीत शेंगदाणे घाला व मटकी संपूर्ण बुडेल इतके पाणी त्यात घाला.
- एक शिट्टी येईपर्यंत मटकी प्रेशर कुकर मधे शिजवून घ्या. एक शिट्टी आल्यावर गॅस बंद करून टाका.
- कुकर गार झाल्यावर मटकी बाहेर काढून घ्या.
- एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग व हळद घाला व मग शिजविलेली मटकी ही घाला.
- ठेचलेला लसूण, हिरव्या मिरच्या व मीठ घालून सर्व मिसळून घ्या.
- काळा मसाला, मीठ व गूळ घालून आवश्यकतेनुसार थोडे पाणी घाला व उसळीला उकळी येऊ द्या.
- उकळी आल्यावर गॅस बंद करा, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व मटकीची उसळ पोळी किंवा भाताबरोबर वाढा.
मिसळीसाठी -
- वाढताना एका बाउल मध्ये थोडा चिवडा किंवा फरसाण घालून त्यावर मटकीची उसळ घाला.
- वरून दोन्ही चटण्या, कांदा, व टोमॅटो घाला.
- आवडत असल्यास तिखट कट ही घाला व वरून आणखीन थोडा चिवडा/फरसाण व बारीक शेव पसरून गरम गरम खायला द्या.
मिसळ-पाव साठी -
वर सांगितल्याप्रमाणे मिसळ तयार करून ती गरम पावाबरोबर वाढा. पाव तव्यावर लोणी लाऊन किंवा नुसतेच भाजून गरम करून घ्या व मग मिसळीबरोबर वाढा.