वऱ्याच्या तांदळाची खिचडी रेसिपी
वऱ्याच्या तांदळाची खिचडी रेसिपी -
उपासाच्या दिवशी झटपट बनविता येण्यासारखा हा पदार्थ आहे. ही खिचडी दोन पद्धतीने बनविता येते - कोरडी साबुदाण्याच्या खिचडी सारखी, किंवा डाळ-तांदळाच्या खिचडीसारखी ओलसर. उपासाच्या दिवशी साठी तर ही अगदी सोपी रेसिपी आहेच, परंतु एरवी सुद्धा ह्याचा कोरडा प्रकार ब्रेकफास्ट साठी खाता येऊ शकतो. इथे मी दोन्ही पद्धतीने ही खिचडी कशी बनवायची ते दिले आहे. अशा करते तुम्हाला दोन्ही प्रकार आवडतील..:)
Ingredients
- पुढील प्रमाणांत, १ कप = २५० मि. ली.
- तेल किंवा तूप - ३ टीस्पून
- जिरे - १ टीस्पून
- हिरव्या मिरच्या - २, छोटे तुकडे करून घेतलेल्या
- बटाटा - सालं काढून चौकोनी काप करून घेतलेला
- वऱ्याचे तांदूळ - १/२ कप
- लाल तिखट - चवीनुसार
- मीठ - चवीनुसार
- साखर - १/२ टीस्पून
- दाण्याचे कूट - १/४ कप
Instructions
वऱ्याच्या तांदळाची खिचडी रेसिपी (कोरडी) -
- वऱ्याचे तांदूळ किंचित गुलाबी दिसेपर्यंत कोरडेच भाजून घ्या.
- त्यात ३/४ कप कडकडीत गरम पाणी घाला व मिसळून तासभर घट्ट झाकून ठेऊन द्या.
- तासाभरांत जवळ-जवळ सगळं पाणी संपेल व तांदूळ फुलून येतील.
- आता तेल/तूप गरम करून त्यात जिरे घाला. हिरवी मिरची व बटाटा ही घाला.
- बटाटे किंचित सोनेरी दिसायला लाल्यावर गॅस बारीक करा व झाकण ठेऊन बटाटे पूर्ण शिजवून घ्या.
- आता त्यात (कृतिक्रमांक ३ मधील) वऱ्याचे तांदूळ घाला व सर्व मिसळून घ्या.
- त्यातच मीठ, साखर, लाल तिखट आणि दाण्याचं कूट घालून परत सर्व मिसळून घ्या.
- अंदाजे २-३ टेबल्स्पून पाणी तांदळावर शिंपडून घाला व गॅस अगदी मंद ठेऊन व झाकण ठेऊन १०-१५ मिनिटे शिजू द्या. दर २-३ मिनिटांनी हालवत रहा.
- वऱ्याचे तांदूळ पूर्णपणे शिजून मऊसर झाले कि गॅस बंद करा. (गरज वाटल्यास १-२ चमचे आणखीन पाणी शिंपडायला हरकत नाही.)
- आता ही गरम गरम वऱ्याच्या तांदळाची खिचडी वाढायला तयार आहे. बरोबर उपासाचे लोणचे ही वाढा.
वऱ्याच्या तांदळाची खिचडी रेसिपी (सरबरीत) -
- वऱ्याचे तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या व सर्व पाणी काढून टाका.
- एका पातेल्यात तेल/तूप गरम करून त्यात जिरे, मिरच्या व बटाटयाच्या फोडी घाला.
- थोडे परतून बटाटाच्या कडा किंचित सोनेरी दिसायला लागल्यावर त्यात धुतलेले वऱ्याचे तांदूळ घाला व सर्व दोन मिनिटे परतून घ्या.
- त्यावर २ कप पाणी घाला.
- गॅस बारीक करून त्यात मीठ व लाल तिखट घालून सर्व मिसळून घ्या.
- पाण्याला उकळी येऊ द्या व उकळी आल्यावर तसेच उकळत ठेवा.
- पाणी साधारण तांदळापर्यंत आले की त्यात दाण्याचे कूट घालून सर्व मिसळून घ्या.
- झाकण ठेऊन एखादा मिनिट मंद शिजू द्या.
- सर्व मिसळून गॅस बंद करून टाका.
- गरम गरम वऱ्याच्या तांदळाची खिचडी वाढायला तयार आहे. सोबत उपासाचे लोणचे ही वाढा.
आशा करते तुम्हाला ही दोन्ही पद्धतीने बनविलेली वऱ्याच्या तांदळाची खिचडी आवडेल. आपले प्रश्न किंवा अभिप्राय नक्की पोस्ट करा. धन्यवाद!