- Serving: १८-२० कडबू साठी
कडबू रेसिपी
कडबू म्हणजे हरभऱ्याच्या डाळीची आणि गुळाची करंजी. पुरण पोळी पेक्षा कडबू करायला सोपे असतात पण खायला पुरण पोळी सारखेच चविष्ट लागतात. मात्र करंजी प्रमाणे कडबू फार दिवस टिकत नाहीत. दोन तीन दिवसापर्यंतच चांगले राहतात.
Ingredients
- कडबूच्या कव्हर साठी :
- गव्हाचं पीठ (कणीक) - १ कप
- तेल - २ टेबलस्पून
- मीठ - चिमूटभर
- भाजलेली खसखस - २-३ टीस्पून
- सारणासाठी :
- हरभऱ्याची डाळ - ३/४ कप
- गूळ - १ कप
- ताजं खवलेलं खोबरं - १/४ कप
- भाजलेली खसखस - १ & १/२ टेबलस्पून
- काजूचे तुकडे - २ टेबलस्पून
- बेदाणे - २ टेबलस्पून
- वेलदोड्याची पूड - १/२ टीस्पून
- जायफळ पावडर - १/४ टीस्पून
- तेल किंवा तूप - कडबू तळण्यासाठी
Instructions
कडबूच्या कव्हर साठी :
- कणकेत मीठ व तेल मिसळून घ्या.
- हळू हळू पाणी घालत पुरीच्या कणके प्रमाणे थोडी घट्टसर कणीक भिजवून घ्या व १०-१५ मिनिटांसाठी झाकून ठेवा.
- भिजविलेल्या कणकेचे एक ते दीड इंच मोठे भाग करून घ्या व प्रत्येक भाग हातानी गोल फिरवून चपटा करून घ्या.
कडबूच्या सारणासाठी :
- हरभऱ्याची डाळ पाण्याने एक दोनदा धुऊन पाणी काढून टाका.
- त्यात २ कप पाणी घालून प्रेशर कुकर मधे तीन शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या. तीन शिट्ट्या आल्यावर पाच मिनिटांसाठी गॅस बारीक करा आणि पाच मिनिटांनी बंद करा.
- कुकर गार झाल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढून घ्या.
- डाळीवर राहिलेलं पाणी सावकाश ओतून बाजूला काढून ठेवा. (हे पाणी म्हणजेच 'कट', तुम्ही 'कटाची आमटी' साठी वापरु शकता.
- शिजलेल्या डाळीत गूळ व खोबरं मिसळून गॅसवर किंवा मायक्रोवेव मधे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. मधे मधे हालवात रहा. (मायक्रोवेव मधे शिजविल्याने खाली लागायची भिती रहात नाही. मी मायक्रोवेव मधे १-२ वेळा मधे हालवत १० मिनिटे शिजविले. गॅसवर शिजविल्यास गॅस बारीक ठेवावा व मधे मधे हालावत रहावे.)
- वरील पुरण हाताने गोळा करता येण्यासारखे झाले की त्यात खसखस, काजू, बेदाणे, वेलदोड्याची पूड व जायफळ पावडर घालून मिसळून घ्या.
- हे सारण गार होण्यासाठी ठेऊन द्या.
पुढील कृति :
- कणकेचा एक भाग घेऊन त्याची एक बाजू खसखसशीत दाबून घ्या.
- आता त्याची पातळ पुरी लाटून घ्या.
- पुरीच्या खसखस न लावलेल्या बाजूच्या मधोमध साधारण दीड टेबलस्पून सारण ठेऊन, करंजी प्रमाणे पुरी अर्धी दुमडून सगळीकडून बंद करून घ्या. ( खसखस लावलेली बाजू कडबूच्या बाहेरच्या बाजूला आली पाहिजे.
- कडा दाबून बंद करा व कातून घ्या किंवा मुरड घाला.
- २-४ कडबू तयार झाले की तळायला सुरवात करायला हरकत नाही.
- गरम तेलात किंवा तुपात बारीक ते मध्यम आचेवर सगळे कडबू सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
- गार झाल्यावर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. हे कडबुू २-४ दिवस छान टिकतील.
कडबुू च्या ह्या रेसिपी मधे खवा घातला तरी छान लागतो. खवा घालायचा असल्यास, २ टेबलस्पून खवा, सरणात काजू, व बेदाणे घालताना त्याबरोबरच मिसळून घ्या.
आशा करते तुम्हाला कडबू ची ही रेसिपी आवडेल. वेबसाईट वर आपला अभिप्राय जरूर टाका. धन्यवाद.
आणखीन काही रेसिपीज ज्या तुम्हाला आवडतील — पुरण पोळी, ओल्या नारळाची करंजी, नारळाची बर्फी